मुंबईच्या महापौरपदासाठी शिंदे गटाला धक्का देण्याची तयारी ? ठाकरे आणि फडणवीसांमध्ये चर्चा? पडद्यामागे काय घडतंय ?
मुंबईच्या महापौरपदासाठी शिंदे गटाला धक्का देण्याची तयारी ? ठाकरे आणि फडणवीसांमध्ये चर्चा? पडद्यामागे काय घडतंय ?
img
वैष्णवी सांगळे
राज्याच्या २९ महापालिकांची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकांचा निकालही जाहीर झाला असून यात महायुतीला बऱ्याच ठिकाणी घवघवीत यश मिळाले आहे. मुंबई महापालिकेत तब्बल ८९ जागा जिंकत भाजप हा मोठा पक्ष ठरला. तर शिवसेना शिंदे गटाला २९ जागा जिंकता आल्या. यानंतर आता सध्या राज्याच्या राजकारणात नगरसेवकांच्या फोडाफोडीवरून जोरदार चर्चा सुरू आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे की, एकनाथ शिंदे आता भाजपचेच नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न करत आहेत. हे चित्र मुंबई आणि कल्याण-डोंबिवली या दोन्ही ठिकाणी पाहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे हे आता भाजपचे लोहपुरुष झाले आहेत. त्यांनी आधी शिवसेना फोडली, आता ते भाजपलाच सुरुंग लावत आहेत. अमित शाह त्यांना दिल्लीत खांद्यावर घेऊन फिरतात, त्यामुळे ते आता काहीही करू शकतात, असा टोला राऊत यांनी लगावला.

दरम्यान, मुंबई महानगरपालिकेतील महापौरपदावरून ठाकरे-भाजपात बोलणी सुरु असल्याची सूत्रांची माहिती आहे. मुंबईत महापौरपदाच्या शर्यतीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फोडाफोडीच्या राजकारणाला शह देण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून उद्धव ठाकरे गट आणि भाजप यांच्यात चर्चा सुरु असल्याचं सांगण्यात येत आहे. महापौरपदाच्या निवडणुकीवेळी ठाकरेंचे ६५ नगरसेवक गैरहजर राहणार असल्याचं बोललं जात आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक गैरहजर राहिल्यास निवडणूक बिनविरोध होईल. त्यामुळे मुंबई महापालिकेत 2017 सालाची भरपाई ठाकरे भाजपला करुन देणार असल्याची चर्चा सुरु आहे. मात्र भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी अशी ठाकरे गटासोबत अशी कोणतीही चर्चा सुरु नसल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे.

तर मुंबईच्या महापौरपदावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी कुठलीही चर्चा झाली नसल्याचा खुलासा उद्धव ठाकरेंकडून करण्यात आला आहे. मात्र समोर येणारी माहिती ही खरी की अफवा हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.
इतर बातम्या
Join Whatsapp Group