मुंबईसह २९ महानगर पालिका निवडणुकांचा निकाल लागून ४ दिवस झाले तरी देखील अद्याप महापौरपदासाठीच्या आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली नाही. सर्वांचे लक्ष महापौरपदाच्या निवडीकडे लागले आहे. महापौरपदासाठी पक्षांमध्ये रस्सीखेच पहायला मिळत आहे. अशातच महापौरपदाच्या आरक्षणाबाबत मोठी बातमी समोर आली आहे.
राज्यातील सर्व २९ महानगरपालिकामधील महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत २२ जानेवारी रोजी काढली जाणार आहे. २२ जानेवारीला सकाळी ११ वाजता सर्व महापालिकांसाठी महापौरपदाची आरक्षण सोडत काढली जाणार आहे. त्यामुळे कोणत्या प्रवर्गाचा महापौर कोणत्या नगरपालिकेमध्ये बसणार हे येत्या २२ जानेवारीला निश्चित होईल. नगरविकास विभागाकडून महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत मंत्रालयात काढली जाईल.
महापौर आरक्षण सोडत प्रक्रीयेत मोठा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. हा ट्विस्ट म्हणजे महापौर आरक्षणाची रोटेशन पद्धत बदलण्याबाबत चर्चा सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. महापौरपदाचे आरक्षण चक्राकार पद्धतीने निश्चित करण्यात येते. सध्या कायद्यात एससी, एसटी, महिला आणि ओबीसींसाठी रोटेशनने आरक्षण आहे. मात्र, नियमातील नव्या बदलानुसार चक्राकार पद्धत नव्यानं सुरु केली जाऊ शकते.यामुळे अनेक इच्छुकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. त्याचसोबत राजकीय गणित देखील बदलणार आहे.