राज्यातील विधासभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून सर्वच राजकीय पक्षांसोबत सामान्य जनतेचेही लक्ष विधासभा निवडणुकीकडे लागले आहे. राज्यात 20 नोव्हेंबर दिवशी मतदान होणार आहे. दरम्यान , महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीमध्ये मतदानासाठी यंदा बीएमसी कडून देखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शहरी भागात मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी ही सुट्टी जाहीर झाली आहे.
दरम्यान , 20 नोव्हेंबर दिवशी रजेवर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या पगार कपातीच्या स्वरुपात कोणतीही दंडात्मक कारवाई केली जाणार नाही असं सांगण्यात आले आहे. उलट आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या मालकांवर कारवाई केली जाईल असे सांगण्यात आले आहे. बीएमसीने निवेदन जारी करत “सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील कंपन्या, कॉर्पोरेशन, उपक्रम, औद्योगिक गट, व्यापार इतर सर्व आस्थापने यांनी कामगार, कर्मचारी आणि अधिकारी यांना विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी 20 नोव्हेंबर 2024 रोजी रजा देणे बंधनकारक आहे.
तसेच, आपत्कालीन सेवेतील कामगारांना किंवा अपवादात्मक परिस्थितीत जिथे पूर्ण दिवसाची रजा शक्य नाही अशा ठिकाणी कर्मचाऱ्यांना मतदान करता यावे यासाठी त्यांना किमान चार तासांची सूट दिली पाहिजे. यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे. असेही बीएमसी ने म्हटलं आहे.