राज्यातील महापालिका निवडणुकांचे निकाल लागले असून आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. एकीकडे महापालिकेचा अंगावरील गुलाल अजून उतरलेलाही नाही तोच दुसरीकडे पुन्हा उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात होत आहे. त्यातच, नंदूरबारमध्ये आता राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार शिरीष चौधरी यांना नंदूरबार शहर पोलिसांनी अटक केली आहे. नेमकं प्रकरण काय ते जाणून घ्या.
नेमकं प्रकरण काय ?
शिंदे गटाचे माजी आमदार शिरीष चौधरी यांचा मुलगा प्रथमेश चौधरी यांना नगरपालिका निवडणुकीनंतर झालेल्या निवडीत उपनगराध्यक्ष पद मिळाले. या निवडीनंतर विजय मिरवणुक काढण्यात आली आणि याच मिरवणुकीत वाद झाला. या वादानंतर रात्री शिरीष चौधरी यांच्या घराची तोडफोड करण्यात आली होती. या घटनेनंतर शहरातील राजकीय वातावरण तणावपूर्ण बनले होते, तसेच दोन्ही बाजूंनी एकमेकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर पोलीस दलातर्फे या गुन्ह्यांबाबत अटक सत्र सुरू करण्यात आले.
घटनेप्रकरणी पोलिसांनी १२ जणांना अटक केली. यात शिंदे शिवसेनेचे माजी आ. शिरीष चौधरी यांचाही समावेश असून त्यांना वैद्यकीय कारणास्तव 29 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.शिरीष चौधरी यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी जयदीप रघुनाथ चौधरी (वय 32 वर्ष रा. चौधरी गल्ली तेलीवाडा नंदुरबार), प्रथमेश मुकेश चौधरी (वय 32, रा. भाट गली, नंदुरबार), शिशुपाल सुभाष राजपूत (वय 31 वर्ष रा. गवळीवाडा नंदुरबार), आकाश काशिनाथ चौधरी (वय 31, रा. गणपती मंदिर रोड नंदुरबार), पंकज अरुण मराठे (वय 28, रा. चौधरी गल्ली नंदुरबार) यांना दि. 12 जानेवारी रोजी अटक करण्यात आली असून त्यांना दि. १९ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
योगेश सुनील बोरसे उर्फ सोनू सूर्यवंशी (वय 23, रा. नंदुरबार) याला काल दि. १८ जानेवारी रोजी अटक करण्यात आली असून दि. 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ताब्यात घेतलेल्या 17 वर्षीय विधी संघर्षित बालकाला बालसुधार गृहात रवाना करण्यात आलं आहे.दरम्यान, उपनराध्यक्ष पदाच्या विजयी मिरवणुकीत चिडवण्याच्या उद्देशाने दंड थोपटुन हावभाव करुन मारहाण करण्यात आल्याच्या घटनेप्रकरणी लकी उर्फ लोकेश दीपक महाले/चौधरी (वय 28 वर्ष, रा. नंदुरबार), बंटी उर्फ निलेश वसंत चौधरी (वय 27), भैय्या सोडा उर्फ प्रशांत कन्हैयालाल चौधरी (वय 42), संकेत प्रवीण चौधरी (वय 29), खुशाल जगदीश चौधरी (वय 30) यांना दि. 16 जानेवारी रोजी अटक करण्यात आली असून त्यांना दि. 23 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
तर माजी आ.शिरीष हिरालाल चौधरी (वय 54) यांना दि. १८ जानेवारी रोजी अटक करण्यात आली असून न्यायालयाने वैद्यकीय कारणास्तव 29 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. १८ जानेवारी रोजी पुन्हा 7 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यांची उशिरापर्यंत चौकशी सुरु होती. या अटकेमुळे नंदूरबारच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, पोलिसांकडून आता पुढे काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे