राज्यातील सर्व सरकारी,निमसरकारी आणि खासगी आस्थापना मधील सर्व कर्मचाऱ्यांना यंदाची संक्रात पावली आहे. १५ जानेवारी रोजी मुंबई, ठाणेसह २९ महापालिकाध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदान करण्यासाठी सरकार कडून सर्व नोकरदार वर्गास भरपगारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
आगामी १५ जानेवारी २०२६ रोजी राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी सार्वत्रिक निवडणुका पार पडणार आहेत. या दिवशी सर्व मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी राज्य सरकारने अधिकृत सुट्टी जाहीर केली आहे. सर्व नागरिकांनी प्रत्येक निवडणुकीमध्ये मतदान करणे अपेक्षित आहे. ही बाब लक्षात घेता लोकप्रतिनिधीत्व कायदा, १९५१ च्या परिच्छेद १३५(बी) नुसार मतदानाच्या दिवशी सर्वसाधारणपणे मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात येते किंवा काही ठिकाणी कामाच्या तासात योग्य ती सवलत देण्यात येते.
ही सुट्टी सर्व सरकारी कार्यालये, निमसरकारी संस्था, व्यापारी प्रतिष्ठाने, बँका आणि खासगी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना लागू असेल. लोकप्रतिनिधीत्व कायदा 1951 च्या कलम 135 (ब) नुसार, मतदानाच्या दिवशी कर्मचाऱ्यांचा पगार कापला जाणार नाही.
मुंबई (BMC), ठाणे (TMC), पुणे (PMC), नवी मुंबई (NMMC) यांसह राज्यातील सर्व 29 महानगरपालिका क्षेत्रांतील मतदारांना ही सवलत मिळेल. ज्या ठिकाणी पूर्ण दिवसाची सुट्टी देणे शक्य नाही अशा ठिकाणी किमान 2 ते 3 तासांची सवलत देणे बंधनकारक असेल.
राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार, जर एखादी खासगी कंपनी किंवा आस्थापना आपल्या कर्मचाऱ्याला मतदानासाठी सुट्टी किंवा सवलत देण्यास नकार देत असेल, तर अशा मालकांविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.