विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान पार पडत आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली आहे. लोकांनी सकाळी सकाळी मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी गर्दी देखील केली आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांसाठी आज एकाच टप्प्यात मतदान होत आहे. या मतदानात अक्षय कुमार, फरहान अख्तर यांसारखे सेलेब्स मतदान करण्यासाठी आले होते.
दरम्यान काही कलाकार मंडळींनीही मतदानाचे कर्तव्य बजावले असून सोशल मीडियावर फोटो शेअर करत मतदान करण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान अभिनेता अक्षय कुमार यानेही मतदान केले आहे. भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर अक्षयने पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावला आहे. दरम्यान त्याला मतदान केंद्रावर एका आजोबांनी अडवले होते. त्यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.
सोशल मीडियावर अक्षय कुमारचा मतदान केंद्रावरील एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओत अक्षय कुमार पत्रकारांशी संवाद साधल्यानंतर कारच्या दिशेने जात होता. तेवढ्यात त्याला एका आजोबांनी अडवल्याचे पाहायला मिळत आहे. ते आजोबा अक्षयला त्यांची समस्या सांगताना दिसत आहेत.
ते आजोबा अक्षय कुमारला म्हणाले, सर तुम्ही ते टॉयलेट बनवलं होतं ते आता सडून गेलं आहे. त्यावर अक्षय कुमार म्हणाला की, मी त्याबाबत BMCशी बोलून घेतो. पण आजोबा एवढ्यावरच थांबले नाही. ते म्हणाले की, लोह्याचा डब्बा असल्यामुळे सडतो. रोज पैसे खर्च करावे लागतात. त्यावर अभिनेता म्हणाला की , बोलतो मी बीएमसीशी. आजोबा पुढे म्हणाले की, अरे डब्बा तुम्हाला द्यायचा आहे, मी लावून घेतो. त्यावर अक्षय म्हणाला की, डब्बा मी दिलेला आहे. मग आजोबा म्हणाले की, तो सडला आहे. अभिनेता म्हणाला की, सडला आहे तर त्यावर आता बीएमसी लक्ष देणार आहे. असे म्हणून अक्षय तिथून निघून गेला.
मतदानानंतर अक्षय म्हणाला... मतदानानंतर अक्षय कुमार मीडियाशी बोलताना म्हणाला की,"खूप चांगली सोय केली आहे. स्वच्छतासुद्धा चांगली ठेवली आहे. तसेच ज्येष्ठ नागरीकांची सुद्धा चांगली काळजी घेण्यात येत आहे." शेवटी अक्षयने सर्वांना मतदान करण्याचं आवाहन देखील केले.