बॉलिवूडचा किंग खान म्हणून ओळख असणाऱ्या आणि ज्याचे कोट्यवधीने फॅन फॉलोवर्स आहे असा शाहरुख खान नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. आता देखील किंग खान एका प्रकरणात अडकला आहे.
अभिनेता शाहरुख खान गेल्या चार महिन्यांपासून त्याच्या ‘मन्नत’ या बंगल्याचे नूतनीकरण करत आहे आणि सध्या तो आपल्या कुटुंबासह जवळच एका भाड्याच्या घरात राहत आहेत. या नूतनीकरणाच्या प्रक्रियेवरून त्याला अनेकदा सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले आहे.
दरम्यान आता समोर आलेल्या माहितीनुसार, बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी मन्नतमध्ये जाऊन नूतनीकरणाची पाहणी केली आहे. हा बंगला मुंबईतील बांद्रा परिसरात समुद्रकिनाऱ्यावर आहे. शाहरुखच्या बंगल्यावर BMC चे कर्मचारी पोहोचले. बंगल्याच्या नूतनीकरण दरम्यान CRZ म्हणजेच कोस्टल रेग्युलेशन झोन नियमांचं उल्लंघन झाल्याचा आरोप केला आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी मुंबई महापालिकेकडे ही तक्रार दाखल केली आहे. शाहरुखचा बंगला मन्नत हा ग्रेड 3 हेरिटेज स्ट्रक्चर्सपैकी एक आहे. म्हणून बंगल्यात कोणतेही मोठे बदल करण्यासाठी त्याआधी परवानगी घेणे आवश्यक आहे. मात्र महापालिकेच्या पथकाने पाहणी केली असून शाहरुखच्या टीमने नियम पाळल्याचे स्पष्ट केले आहे.
शाहरुख खानची आगामी फिल्म
वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर शाहरुख खान लवकरच ‘किंग’ या त्याच्या आगामी चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटात त्याची मुलगी सुहाना खान मुख्य भूमिकेत असणार आहेत. अभय वर्माही या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत.