बांगलादेशमध्ये हिंदू अल्पसंख्याकांवर होत असलेला अन्याय कोणापासून लपून नाही. हिंदूंवरील हिंसाचाराच्या घटनांमुळे भारतात चिंता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर आयपीएलमध्ये बांगलादेशी खेळाडूला संधी देण्यावर भाजप आणि शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी आक्षेप नोंदवला होता. या प्रकरणामुळे शाहरुख खान आणि केकेआर फ्रँचायझीवर सातत्याने टीकेचे बाण सोडले जात होते. मुस्तफिजुर रहमान या बांगलादेशी खेळाडूमुळे वातावरण चांगलाच तापलं.
वाद पेटल्यामुळे बीसीसीआयने या प्रकरणात थेट हस्तक्षेप केला. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाचे सचिव देवजीत सैकिया यांनी आयपीएल फ्रँचायझी कोलकाता नाइट रायडर्सला बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमान याला संघातून मुक्त करण्याचे निर्देश दिले आहेत. देवजीत सैकिया यांनी सांगितले की, “देशभरातील सध्याच्या घडामोडी लक्षात घेता बीसीसीआयने केकेआर फ्रँचायझीला बांगलादेशचा खेळाडू मुस्तफिजुर रहमान याला संघातून रिलीज करण्याचे निर्देश दिले आहेत.” तसेच, केकेआरने पर्यायी खेळाडूची मागणी केल्यास त्याला बीसीसीआयची परवानगी दिली जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
आयपीएल २०२६ साठी डिसेंबरमध्ये झालेल्या मिनी लिलावात केकेआरने मुस्तफिजुर रहमानला संघात सामील करून घेतले होते. या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजासाठी केकेआरने 9.20 कोटी रुपयांची मोठी बोली लावली होती. मुस्तफिजुरसाठी केकेआर आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात चुरशीची स्पर्धा पाहायला मिळाली होती. अखेर केकेआरने मोठी रक्कम मोजून त्याला आपल्या ताफ्यात घेतले. मात्र खरेदीनंतर लगेचच केकेआर आणि शाहरुख खान टीकेच्या केंद्रस्थानी आले.