दैनिक भ्रमर : विराट कोहली याच्या अनुपस्थितीत आणि युवा खेळाडूंच्या सोबतीने भारताला काही वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलिया विरुद्ध ऐतिहासिक कसोटी मालिका जिंकून देणाऱ्या अजिंक्य रहाणे याने मोठा निर्णय घेतला आहे. रहाणेने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय जाहीर केला आहे. रहाणेने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे. आयपीएलच्या 18 व्या मोसमात कोलकाता नाईट रायडर्सचं नेतृत्व करणाऱ्या रहाणे याने मुंबई रणजी ट्रॉफी संघाचे कर्णधारपद सोडलं आहे. रहाणेने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन याबाबतची घोषणा केली आहे.
हे ही वाचा...
अजिंक्य काय म्हणाला?
"मुंबई संघाकडून खेळताना कर्णधारपद भूषवणे आणि विजेतेपद पटकावणे हा एक सन्मान आहे," असं रहाणेने सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिलं आहे. "नवीन स्थानिक हंगाम येत असल्याने, मला वाटते की नवीन कर्णधार तयार करण्याची ही योग्य वेळ आहे. म्हणूनच मी कर्णधार पदाची जबाबदारी न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. मी खेळाडू म्हणून माझे सर्वोत्तम देण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे आणि एमसीएसोबत माझा प्रवास सुरू ठेवेन जेणेकरून आम्हाला अधिक ट्रॉफी जिंकता येतील. हंगामासंदर्भात मी फार उत्सुक आहे," असं रहाणेनं स्पष्ट केलं आहे.