क्रिकेटच्या चाहत्यांना मोठा धक्का देणारी आणखी एक बातमी समोर आली आहे. कारण आता रोहित पाठोपाठ विराट कोहलीनेही कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने बीसीसीआयलाही याबद्दल माहिती दिली आहे. या निर्णयानंतर आता विराट हा आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघात सहभागी होण्याची शक्यता खूपच कमी आहे.
मात्र असं असलं तरी बोर्डाच्या एका उच्चस्तरीय अधिकाऱ्याने कोहलीला या निर्णयाचा पुनर्विचार करण्याचे आवाहन केले आहे. आता निवड समिती इंग्लंड दौऱ्यासाठी संघ जाहीर करताना कोहलीच्या भविष्याबाबत काय निर्णय घेते हे पाहणे महत्वाचं आहे.
विराटच्या आधी, हिटमॅन रोहित शर्माने बुधवारी (7 मे) कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. 7 मे रोजी त्याने इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आणि लाल चेंडूच्या क्रिकेटला निरोप देत असल्याचे जाहीर केलं.मात्र, तो अजूनही एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सामने खेळत राहणार आहे. गेल्या वर्षी वेस्ट इंडिजमध्ये टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर 38 वर्षीय रोहित शर्माने टी-20 फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली.
रोहितप्रमाणेच, कोहलीनेही 2024 चा टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटला अलविदा म्हटले. अशा परिस्थितीत, आता क्रिकेटच्या चाहत्यांना ROKO जोडी फक्त एकदिवसीय सामन्यात खेळताना दिसेल. हे दोघेही सध्या आयपीएल क्रिकेटमध्ये खेळत होते. पण भारत-पाकिस्तान तणावामुळे ही स्पर्धा स्थगित करण्यात आली आहे.