दैनिक भ्रमर : क्रिकेटप्रेमी तसेच शुभमन गिलच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. भारताचा कसोटी कर्णधार शुभमन गिल याची जुलै महिन्यासाठी आयसीसी 'पुरुष प्लेअर ऑफ द मंथ' म्हणून निवड करण्यात आली आहे. गिलने इंग्लंडमध्ये जुलै महिन्यात खेळल्या गेलेल्या तीन कसोटी सामन्यांमध्ये ९४.५० च्या प्रभावी सरासरीने ५६७ धावा फटकावल्या होत्या. हा प्रतिष्ठित पुरस्कार तब्बल चौथ्यांदा जिंकणारा तो पहिला पुरुष खेळाडू ठरला आहे. आतापर्यंत चार वेळा त्यानं या पुरस्कारावर आपली मोहोर उमटवली आहे. अशी कामगिरी करणारा तो जगातील एकमेव खेळाडू ठरला आहे.
यापूर्वी त्याला जानेवारी २०२३, सप्टेंबर २०२३ आणि फेब्रुवारी २०२५ मध्ये या पुरस्काराने गौरविण्यात आले होते. या पुरस्काराच्या शर्यतीत गिलसोबत इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स आणि दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू वियान मुल्डर यांचा समावेश होता. महिला क्रिकेटमध्ये ॲश गार्डनर आणि हेली मॅथ्यूज यांनी प्रत्येकी चार वेळा हा पुरस्कार जिंकण्याची कामगिरी केली आहे.
गिलने इंग्लंडविरुद्ध बर्मिंगहॅम येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात तब्बल ४३० धावांची विक्रमी खेळी केली होती. त्याच्या २६९ आणि १६१ धावांच्या खेळीमुळे भारताला मालिकेत १-१ अशी बरोबरी साधता आली. त्यानंतर, मँचेस्टर येथे झालेल्या चौथ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात त्याने १०३ धावांची महत्त्वपूर्ण खेळी करून सामना अनिर्णित राखण्यात आणि मालिका जिवंत ठेवण्यात मोलाची भूमिका बजावली.
जुलै महिन्याचा आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ हा पुरस्कार मिळाल्यानं खूप छान वाटतंय. यावेळी हा पुरस्कार खूप खास आहे. कर्णधार म्हणून ही माझी पहिली मालिका होती आणि त्यात हा पुरस्कार मला मिळाला आहे. बर्मिंघममधलं द्विशतक अविस्मरणीय क्षणांपैकी एक असेल. या पुरस्कारासाठी माझी निवड केल्यानं ज्युरींना धन्यवाद देऊ इच्छितो.
- शुभमन गिल