अहमदाबादमध्ये राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील एलिमिनेटर सामन्यापूर्वी धक्कादायक बातमी समोर आली आहे. बुधवार, २२ मे रोजी नरेंद्र मोदी स्टेडियमवर राजस्थान आणि बंगळुरु या दोन संघांमध्ये एलिमिनेटर सामना खेळला जाणार आहे, परंतु त्याच्या एक दिवस आधी, आरसीबीने त्यांचे एकमेव सराव सत्र रद्द केले.
विराट कोहलीसह संपूर्ण संघाच्या सुरक्षेला लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचा दावा रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. सोमवार, २० मेच्या रात्री अहमदाबादमध्ये पोलिसांनी दहशतवादी कारवायांच्या संशयावरून चार जणांना अटक केली होती, त्यानंतर आरसीबीने सुरक्षा लक्षात घेऊन हा निर्णय घेतला.
आरसीबीने कोणतेही कारण न देता मंगळवारी नियोजित सराव रद्द केला आहे. केवळ सरावच नाही तर पत्रकार परिषदही रद्द करण्यात आली. मंगळवारी नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या पहिल्या क्वालिफायर सामन्यामुळे आरसीबी आणि राजस्थान गुजरात कॉलेज मैदानावर सराव करणार होते पण आरसीबीने तो रद्द केला. राजस्थान संघ सरावासाठी आला असला तरी त्यांनी पत्रकार परिषद घेतली नाही.
मंगळवारी क्वालिफायर वन सामना होणार असल्याने बंगळुरू आणि राजस्थान संघांसाठी नरेंद्र मोदी स्टेडियम सरावासाठी उपलब्ध नव्हते. त्यामुळे त्यांना सरावासाठी गुजरात कॉलेज ग्राऊंड सरावासाठी पर्याय म्हणून उपलब्ध करून देण्यात आले होते. मात्र, बंगळुरूने सरावाला नकार दिला, तर राजस्थानने मात्र सराव केला. दरम्यान राजस्थान संघाचा कर्णधार संजू सॅमसनसह अनेक खेळाडू सरावासाठी आले होते, मात्र यावेळी कडेकोट पोलीस बंदोबस्त होता आणि पोलीसही मैदानावर फिरत होते.
गुजरात पोलीस अधिकाऱ्यांनी कल्पना दिले की बंगळुरूने त्यांचे सराव सत्र रद्द करण्यामागे आणि दोन्ही संघांची पत्रकार परिषद रद्द करण्यामागे प्राथमिक कारण विराट कोहलीच्या जीवाला धोका, हे आहे. अहमदाबाद विमानतळावरून अटक केलेल्या संशयितांकडून शस्त्र जप्त करण्यात आली आहेत. तसेच त्यांच्याकडे संशयीत व्हिडिओ आणि मेसेज सापडले आहेत. याबाबतची माहिती राजस्थान आणि बंगळुरू संघाला देण्यात आली होती, ज्यावर राजस्थानने काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही, पण बंगळुरूने सुरक्षा अधिकाऱ्यांना कळवले की ते सराव करणार नाहीत. तसेच रिपोर्ट्सनुसार बंगळुरूने सराव रद्द करण्यामागील कोणतेही अधिकृत कारण दिलेले नाही. राजस्थान आणि बंगळुरू सोमवारी अहमदाबादला पोहचले होते.