देशांतर्गत क्रिकेटमधील महत्वाची स्पर्धा समजली जाणारी विजय हजारे ट्रॉफी टुर्नामेंट येत्या २४ डिसेंबरपासून सुरु होणार आहे. विराट कोहलीच्या क्रिकेट फॅन्सचा उत्साह वाढणार आहे कारण या स्पर्धेत खेळण्यासाठी विराट कोहलीने होकार दिला आहे. मुख्य म्हणजे अनेक वर्षानंतर कोहली या टुर्नामेंटमध्ये खेळणार आहे.
विराट कोहलीने इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये टेस्ट आणि T20 फॉर्मेटमधून रिटायरमेन्ट घेतली आहे. आता तो फक्त वनडेमध्ये देशाचं प्रतिनिधीत्व करतो. तिथे एक मॅच खेळण्यासाठी त्याला 6 लाख रुपये मिळतात. 50 ओव्हर फॉर्मेटमध्ये खेळल्या जाणाऱ्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये तो खेळण्यासाठी उतरेल, तेव्हा एका मॅचसाठी त्याला किती पैसे मिळतील? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
विराट कोहली 2010 नांतर पहिल्यांदाच विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळणार आहे, जिथे तो प्रत्येक मॅचसाठी 60000 रुपये कमवू शकतो. विजय हजारे ट्रॉफीमध्ये प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट असलेल्या वरिष्ठ खेळाडूंइतकीच मॅच फी आहे. आता, जर विराट कोहलीने तीन सामने खेळले तर तो 1,80,000 रुपये कमवू शकतो.
विजय हजारे ट्रॉफीमध्ये विराट आपली घरची टीम दिल्लीकडून खेळणार आहे. टुर्नामेंटमध्ये दिल्लीच शेड्यूल पाहिलं तर 24 डिसेंबरला त्यांचा सामना आंध्र प्रदेश विरुद्ध आहे. 26 डिसेंबरला गुजरात विरुद्ध आणि 29 डिसेंबरला सौराष्ट्राविरुद्ध आहे. त्यानंतर 31 डिसेंबरला दिल्लीच्या टीमचा सामना ओदिशा विरुद्ध आहे. 3 जानेवारीला दिल्ली सर्विसेज विरुद्ध खेळणार आहे. 6 जानेवारीला दिल्लीचा सामना रेल्वे विरुद्ध होईल. 8 जानेवारीला दिल्लीचा शेवटचा सामना हरियाणा विरुद्ध आहे.