अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय फलंदाज विराट कोहली यांच्या घरी चिमुकल्याचं आगमन झालं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून विरुष्का लवकरच दुसऱ्या बाळाचं स्वागत करणार असल्याच्या चर्चा चालू होत्या. अखेर आज इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत अभिनेत्रीने दुसऱ्यांदा आई झाल्याची गोड बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.
अनुष्का शर्माने १५ फेब्रुवारीला गोंडस मुलाला जन्म दिला. अनुष्काने लंडनमध्ये त्यांच्या दुसऱ्या मुलाला जन्म दिला. विराट-अनुष्काने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. तसेच या पोस्टमध्ये या दोघांनी त्यांच्या बाळाचं नाव देखील सांगितलं आहे.
विराट कोहलीने मंगळवारी (२० जानेवारी २०२४) सोशल मीडियावर एक पोस्ट केली, ज्यात त्याने म्हटले आहे की, “तुम्हा सर्वांना कळविण्यात आनंद होत आहे की, १५ फेब्रुवारीला आमच्या घरी चिमुकल्या ‘अकाय’चं आणि वामिकाच्या लहान भावाचं आगमन झालं. आयुष्यातील या सर्वात सुंदर प्रसंगी तुमचे आशीर्वाद व शुभेच्छा आमच्याबरोबर कायम असूद्या. याशिवाय आमच्या प्रायव्हसीचा आदर करा ही विनंती.”
विराट कोहलीने त्यांच्या दुसऱ्या बाळाच्या जन्माबाबत सोशल मीडियावर पोस्ट करताच जगभरातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला.