आशिया कप २०२५ मधील भारत-पाकिस्तान सामन्यांमधील वादग्रस्त घटनांनंतर, आयसीसीने अखेर आपला निर्णय जाहीर केला आहे. आशिया कप 2025 स्पर्धेत भारत पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेले संघ तीन वेळा भिडले. या हायव्होल्टेज सामन्यात आक्रमकता पाहायला मिळाली. या निर्णयात पाकिस्तानी वेगवान गोलंदाज हॅरिस रौफ, साहिबजादा फरहान, भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
आयसीसीने पाकिस्तानी खेळाडू हॅरिस रौफला दोन सामन्यांसाठी निलंबित केले आहे, सोबतच त्याच्या सामना फीच्या ६० टक्के दंडही ठोठावला आहे. तर सूर्यकुमार यादववर मॅच फीच्या 30 टक्के दंड आणि दोन डिमेरिट पॉइंट्स देण्यात आले आहेत.
याशिवाय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने हारिस रऊफची विकेट घेतल्यानंतर फायटर जेट पाडल्याचा इशारा केला होता. त्यामुळे त्यालाही एक डिमेरिट पॉइंट दिला आहे. तर अर्धशतकी खेळी केल्यानंतर एके 47 सेलीब्रेशन करणाऱ्या साहिबजादा फरहानला एक डिमेरिट पॉइंट दिला आहे.
या कठोर निर्णयामुळे क्रिकेट विश्वात खळबळ उडाली असून, खेळाडूंच्या मैदानातील वर्तनाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.