भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यातून मिळालेल्या पैशांचा पाकिस्तानात काय वापर होईल? यात कोणतीही शंका नाही की पाकिस्तान त्याचा वापर फक्त दहशतवादासाठी करेल. तो एक दहशतवादी देश आहे. तुम्ही त्यांना पैसे पुरवाल आणि ते त्याचा वापर पुन्हा आपल्यावर हल्ला करण्यासाठी करतील. हे मला समजले आहे, पण लोकांना हे समजत नाहीये त्यामुळे मी लोकांना या सामन्यावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करते. तुम्ही तो बघायला जाऊ नका. तसंच हा सामना पाहण्यासाठी तुमच्या घरातील टीव्ही देखील चालू करु नका. असं म्हटलंय वीरपत्नी ऐशान्या द्विवेदी यांनी .
भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात आशिया कप २०२५ मधील लढत रविवारी दुबईमध्ये होणार आहे. सोशल मीडियावर या सामन्यावर बहिष्कार घालण्याचं आवाहन फॅन्सकडून केलं जात आहे. त्याचवेळी पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावलेले शुभम द्विवेदी यांच्या पत्नी ऐशान्या द्विवेदी यांनीही भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या या सामन्याबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत.
ऐशान्या द्विवेदी यांनी सांगितलं की, 'बीसीसीआयने भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना खेळण्यास मान्यता द्यायला नको होती. मला वाटते की बीसीसीआय त्या २६ कुटुंबांबद्दल संवेदनशील नाही. १ - २ क्रिकेटपटू सोडून, कुणीही पुढे येऊन हे म्हटले नाही की, आपण पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकला पाहिजे. बीसीसीआय त्यांना बंदूक दाखवून खेळायला भाग पाडू शकत नाही. त्यांनी आपल्या देशासाठी उभे राहिले पाहिजे. पण ते असे करत नाहीत. मला सामन्याच्या प्रायोजकांना आणि प्रसारकांना विचारायचे आहे की त्या २६ कुटुंबांबद्दल त्यांचे काही कर्तव्य नाही का? असा सवाल तिने उपस्थित केला आहे.