"या" स्पर्धेसाठी नाशिकचा साहिल पारख महाराष्ट्र संघाचा कर्णधार
img
दैनिक भ्रमर
नाशिक क्रिकेटसाठी आनंदाची व अभिमानाची बातमी. आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधील पदार्पणाच्या मालिकेत झंझावाती शतक झळकावलेल्या नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा युवा खेळाडू ,आक्रमक डावखुरा सलामीवीर साहिल पारख याची बीसीसीआयच्या विनू मंकड स्पर्धे साठी, १९ वर्षांखालील वयोगटातील महाराष्ट्र संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे.


नाशिकचा खेळाडू भारतीय संघात असावा हे सर्व नाशिककरांचे स्वप्न साहिल पारख साकार करत सप्टेंबर २०२४ मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत आक्रमक डावखुरा सलामीवीर साहिल पारखने १९ वर्षांखालील भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करतांना, आपल्या लौकिकास साजेशी फलंदाजी करत, केवळ ७५ चेंडूत १४ चौकार व तब्बल ५ षटकारांसह नाबाद १०९ धावा फटकावत,  भारतीय संघाला केवळ २२ षटकांतच ९ गडी राखून जोरदार विजय मिळवून दिला होता.

त्यानंतर मागील २०२४-२५ च्या हंगामात साहिल पारख याची बीसीसीआयच्या विनू मंकड स्पर्धे साठी, १९ वर्षांखालील वयोगटातील महाराष्ट्र संघाच्या उपकर्णधारपदी निवड झाली होती . साहिल पारख ६ मे ते १६  मे दरम्यान झालेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळ - बीसीसीआय - तर्फे आयोजित नॅशनल क्रिकेट अकादमी - एन सी ए - च्या बेंगळुरू येथे झालेल्या इंटर सेंटर ऑफ एक्सलन्स स्पर्धेत निवडला गेला होता. भारतभरातील उदयोन्मुख युवा खेळाडूंसाठी बीसीसीआयच्या एन सी ए, बेंगळुरू तर्फे आयोजित राष्ट्रीय पातळीवरील शिबीरात साहिलची गेल्या सलग ३-४ वर्षांपासून निवड होत आहे. वेळोवेळी झालेल्या राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्पर्धेत केलेल्या लक्षणीय कामगिरीच्या जोरावरच १९ वर्षांखालील महाराष्ट्राच्या संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ - बीसीसीआय - २०२५ -२६  ची १९ वर्षांखालील  वयोगटासाठीची विनू मंकड स्पर्धा  ९ ऑक्टोबर  ते १  नोव्हेंबर दरम्यान नियोजित असून  रांची  येथे एलिट गटात होणारे महाराष्ट्र संघाचे साखळी सामने पुढीलप्रमाणे :
९ ऑक्टोबर - उत्तर प्रदेश , ११ ऑक्टोबर - दिल्ली , १३  ऑक्टोबर - आसाम , १५  ऑक्टोबर - राजस्थान , १७  ऑक्टोबर - पंजाब.
साहिलच्या या महत्वाच्या निवडीबद्दल नाशिक जिल्हा क्रिकेट संघटना व जिल्हा संघात, तसेच जिल्ह्यातील क्रिकेट रसिकांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सेक्रेटरी समीर रकटे यांनी साहिलचे अभिनंदन करून आगामी विनू मंकड स्पर्धेतील यशस्वी कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group