आज कोलंबोच्या के आर प्रेमदासा स्टेडियममध्ये टी20 वर्ल्ड कपच्या ग्रुप बीमध्ये झिम्बाब्वेने मोठा उलटफेर करत ऑस्ट्रेलियाला चारी मुंड्या चीत केलं. यासह, झिम्बाब्वेने स्पर्धेत सलग दुसरा विजय मिळवला आहे. टी-20 विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरुद्ध झिम्बाब्वेचा हा दुसरा विजय आहे. यापूर्वी 2007 मध्येही झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला पराभूत केले होते. त्यानंतर तब्बल १९ वर्षंनी इतिहासाची पुनरावृत्ती झाली. दरम्यान चाहते आता भारत-पाकिस्तान सामन्यावर नजर ठेऊन असताना मोठी माहिती समोर येत आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय-व्होल्टेज सामना १५ फेब्रुवारी २०२६ रोजी कोलंबो येथे खेळवला जाणार आहे. आशिया कपच्या फायनलनंतर प्रथमच हे दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी एकमेकांसमोर येणार आहेत. भारतीय संघ आपली विजयी मालिका कायम राखण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तर पाकिस्तान संघ मागील पराभवाचा बदला घेण्याच्या जिद्दीने मैदानात उतरणार आहे. मात्र या सामन्यानावर एक मोठे संकट आल्याचे म्हटले जात आहे.
हे संकट म्हणजे , कोलंबोतील हवामान सध्या अस्थिर आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार १२ ते १४ फेब्रुवारी दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता आहे. १५ फेब्रुवारी रोजीही दिवसभर सुमारे १७ टक्के पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. वाऱ्याचा वेगही २८ किमी/तास पर्यंत पोहोचू शकतो. मात्र, क्रिकेटप्रेमींना दिलासा देणारी बातमी ही की, सायंकाळी सामन्याच्या वेळेत (T20 सामन्याची वेळ) पावसाची शक्यता खूपच कमी आहे. अशा स्थितीत पूर्ण सामना निर्धारित वेळेत पूर्ण होण्याची शक्यता जास्त आहे आणि चाहत्यांना रोमांचक सामना पूर्ण पाहण्याची संधी मिळू शकते.
टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत १३ सामने खेळले गेले आहेत. यातील १० सामने भारताने जिंकले आहेत, तर पाकिस्तानला फक्त ३ विजय मिळाले आहेत. मागील आशिया कपमध्येही भारताने पाकिस्तानविरुद्ध सलग तीन विजय नोंदवले होते. या पार्श्वभूमीवर भारतीय संघ पुन्हा एकदा आपला दबदबा कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल.