नाशिक (भ्रमर प्रतिनिधी): - नाशकात महाराष्ट्र विरुद्धच्या सुरू असलेल्या रणजी सामन्यात हार्विक देसाई व जय गोहिल यांनी आपापली शतके झळकावत सौराष्ट्राच्या संघाला सुस्थितीत नेऊन ठेवले.
येथील अनंत कान्हेरे मैदानावर सुरू असलेल्या महाराष्ट्र विरुद्ध सौराष्ट्र सामन्याच्या चौथ्या व अखेरच्या दिवशी हार्विक देसाई व जय गोहिल यांनी सकाळच्या सत्रात आपली मॅरेथॉन खेळी कायम ठेवली. अखेरचे वृत्त हाती आले तेव्हा सौराष्ट्राने 63 षटकांत एक बाद 226 धावा केल्या होत्या.
हार्विक देसाई 100 तर जय गोहिल 105 धावांवर खेळत होते. गेल्या तीन दिवसांपासून गोहिल व देसाई हे फलंदाज मैदानावर तळ ठोकून आहेत. सौराष्ट्राचा संघ डाव कधी घोषित करणार याकडे आता लक्ष लागले आहे. डाव घोषित करून महाराष्ट्राच्या फलंदाजांना झटपट बाद करण्याचा व गुण वसूल करण्याचा प्रयत्न सौराष्ट्र संघाचा राहणार आहे.