नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- कर्तव्यावर असलेल्या पोलीस हवालदाराला खुर्चीने मारून मायलेकीने राडा केल्याची घटना जिल्हा शासकीय रुग्णालयातील पोलीस चौकी येथे घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की दि. 7 डिसेंबर रोजी पोलीस हवालदार योगेशकुमार शांताराम अहिवळे हे जिल्हा शासकीय रुग्णालयातील पोलीस चौकीत सकाळी 9 ते रात्री 9 या वेळेत कर्तव्यावर होते.
रात्री 8 वाजेच्या सुमारास आरोपी पूजा प्रल्हाद धुमाळ व तिची मुलगी वैष्णवी प्रल्हाद धुमाळ (दोघे रा. मोहाडी, ता. दिंडोरी) या दोघी तेथे आल्या व एमएलसीवरून दोघींनी अहिवळे यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. पूजा धुमाळ हिने अहिवळे यांना आईवरून शिवीगाळ करून खुर्चीने अहिवळे यांच्या डोक्यावर जोरात मारहाण केली. हा सर्व तमाशा वैष्णवी धुमाळ आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करीत होती.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून तुझी इज्जत व नोकरी घालविते, अशी धमकी धुमाळने अहिवळे यांना दिली. धुमाळने नंतर योगेशकुमार अहिवळे यांची कॉलर पकडून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी अहिवळे यांच्या फिर्यादीवरून धुमाळ मायलेकींविरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार वाक्चौरे करीत आहेत.