नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) - विजयी उमेदवाराच्या मिरवणुकीदरम्यान पराभूत उमेदवाराच्या घरासमोर सुतळी बॉम्ब व ज्वलनशील पदार्थ पेटवून घर पेटवून देण्याच्या उद्देशाने आतषबाजी करीत पराभूत उमेदवाराच्या गळ्यातील पाच तोळ्यांचे मंगळसूत्र लंपास करून विनयभंग केल्याचा प्रकार उपनगर येथे घडला.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी महिला ही मनपाच्या निवडणुकीसाठी उभी होती. या निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या पूजा नवले या विजयी झाल्या. सायंकाळी 6 च्या सुमारास नवले व त्यांचे समर्थक मिरवणुकीदरम्यान रथ घेऊन फिर्यादीच्या घरासमोर आले. त्यांनी पूजा नवले यांचे पती प्रवीण नवले हे 20 ते 25 कार्यकर्त्यांसह फिर्यादीच्या बंगल्याकडे येणार्या रस्त्याने घोषणाबाजी करीत हल्ल्याच्या उद्देशाने फिर्यादीच्या बंगल्यासमोर सुतळी बॉम्ब, फटाके व ज्वलनशील पदार्थ पेटवून फिर्यादीचे घर पेटविण्याच्या उद्देशाने फेकत होते.त्यामुळे फिर्यादीच्या बंगल्याखाली पार्किंगमध्ये आग लागली.
ही आग विझविण्यासाठी फिर्यादीच्या मुली बंगल्याच्या गेटजवळ आल्या आणि आग विझवू लागल्या. दरम्यान, आरोपी नवले हे त्यांच्या समर्थकांसह शिवीगाळ करीत होते. फिर्यादी महिलेने प्रतिकार केला असता स्त्रीमनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करून फिर्यादीचा विनयभंग केला, तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या झटापटीमध्ये फिर्यादीच्या गळ्यातील पाच तोळे वजनाचे अडीच लाख रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र लंपास केले.
हा प्रकार पाहून फिर्यादीचे पुतणे मदतीसाठी आले असता त्यांनाही जमावाने शिवीगाळ करीत मारहाण केली. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात पूजा नवले, प्रवीण नवले व 10 ते 15 अनोळखी इसमांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पवार करीत आहेत.