महाराष्ट्रातील २९ महापालिकांचा निकाल जाहीर झाला असून बहुतांश जागांवर भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व दिसत आहे. तर 20 वर्षांनी एकत्र येत युती केलेल्या ठाकरे बंधूंना बीएमसी देखील गमावावी लागली आहे.
याच निकालाच्या, पराभवाच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक पोस्ट लिहिली होती. त्यांच्या या पोस्टची खूप चर्चा होत आहेच.त्यानंतर आता मनसे नेते अमित ठाकरे यांनीही सोशल मीडियावर पोस्ट लिहीली आहे. राज ठाकरे यांच्या पोस्टनंतर आता ठाकरे कुटुंबातील या नेक्स्ट जनरेशनचीही पोस्ट खूप व्हायरल होत आहे.
अमित ठाकरे यांची पोस्ट
मराठी माणसासाठी आमचा लढा सुरुच राहील !
निकाल काहीही असो… खंत एकाच गोष्टीची वाटते की, माझ्या मराठी माणसाला जे अपेक्षित होतं, ते देण्यासाठी मला कदाचित अजून थोडी मेहनत घ्यावी लागेल. पण एक लक्षात ठेवा, माझं आणि तुमचं नातं फक्त एका ‘बटनापुरतं’ किंवा ‘मतापुरतं’ कधीच नव्हतं. राजकारणात जय-पराजय होतच असतो, पण माणसांची मनं जिंकणं माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे.
तुम्ही आम्हाला जे प्रेम आणि साथ दिली, ती कोणत्याही सत्तेपेक्षा मोठी आहे. माझा शब्द आहे तुम्हाला… सत्ता असो किंवा नसो, तुमच्या हक्कासाठी महाराष्ट्र सैनिक आणि शिवसैनिक नेहमी धावून येतील. ‘महाराष्ट्र’ आणि ‘मराठी’ माणसाच्या हितासाठी आमचा लढा यापुढेही सुरुच राहील. खचून जाऊ नका… ‘मराठी’ला आणि ‘मराठी माणसाला’ कधीच एकटं पडू देणार नाही… हा शब्द आहे ठाकरेंचा !
जय महाराष्ट्र
अमित ठाकरे