"शत्रूंना जे अप्रत्यक्षपणे मदत करतात, ते सुद्धा महाराष्ट्राचे शत्रू" ; नेमकं काय म्हणाले संजय राऊत....
img
Dipali Ghadwaje
राज्याच्या राजकारणातून एक महत्वाची बातमी समोर आलीआहे. लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत म्हणून बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं विधानसभेला सध्या तरी 'एकला चलो रे'ची भूमिका घेतल्याचं दिसत आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंकडून मागील अनेक आठवड्यांपासून विधानसभेची तयारी सुरु केल्याचं दिसत आहे. राज ठाकरेंच्या बैठका, मेळावे आणि मार्गदर्शनासाठीचे दौरे सुरु आहेत. असं असतानाच दुसरीकडे राज यांचे पुत्र अमित ठाकरे यांदा विधानसभा लढवण्यासाठी उत्सुक असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यांनी स्वत: तशी इच्छा व्यक्त केल्याचं सांगितलं जात आहे. 

मात्र अमित ठाकरेंनी निवडणूक लढवण्यास त्यांचे चुलत काकांचा म्हणजेच उद्धव ठाकरेंचा पक्ष त्यांना सहकार्य करणार का? याबद्दलची चर्चा राजकीय वर्तुळात असतानाच यावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया नोंदवली आहे. 

नक्की वाचा >>>> काळीज हेलावून घटना! मुलगा बुडत होता, वडील मदतीला धावले, अन् अघटित घडलं......

अमित ठाकरे निवडणूक लढवणार याकडे कसे पाहता?

पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत यांना अमित ठाकरेंच्या संभाव्य उमेदवारीसंदर्भात प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावर त्यांनी, "आपल्याकडे लोकशाही आहे. त्यांचा एक स्वतंत्र पक्ष असून त्यांचे वडील पक्षाचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या पक्षाने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यास मी कशाला त्यावर व्यक्त व्हावे? अमित ठाकरे त्यांच्या पक्षाचे एक महत्त्वाचे तरुण नेते आहेत. त्यांना निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. त्यांच्या पक्षाचा किंवा कुटुंबाचा त्यांना लढवण्याचा निर्णय असेल तर त्याकडे आम्ही 'एक करुण मुलगा राजकारणात येतोय' असेच बघू," असं उत्तर दिलं.
 
पत्रकारांनी संजय राऊत यांना आदित्य ठाकरेंनी पहिल्यांदा वरळीमधून 2019 साली विधानसभा निवडणूक लढवली होती तेव्हा मनसेनं सहकार्य केलं होतं अशी आठवण राऊत यांना करुन दिली. मनसेनं आदित्य ठाकरेंविरुद्ध मतदारसंघातून उमेदवार दिला नव्हता. आता अमित ठाकरेंनी निवडणूक लढवण्यास उद्धव ठाकरेंचा शिवसेना पक्ष असेच सहकार्य करणार का? असा प्रश्न राऊत यांना विचारण्यात आला. या प्रश्नावर राऊत यांनी, "खरं तर ते भाजपाबरोबर आहेत. त्यांचा पक्ष भाजपा किंवा शिंदे गटाबरोबर असल्याचं आपण लक्षात घेतलं पाहिजे. राज ठाकरे कधीही स्वबळावर लढत नाहीत. ते एकतर शिवसेनेला विरोध करणाऱ्या म्हणजेच महाराष्ट्राला विरोध करणाऱ्या लोकांसोबत असतात. असा आमचा तरी आतापर्यंतचा अनुभव आहे," असा टोला लगावला.

राऊत म्हणतात, महाराष्ट्राचे 3 शत्रू

"महाराष्ट्राला कमकुवत करणाऱ्या ज्या शक्तींमध्ये महाराष्ट्राचे तीन शत्रू आहेत. भाजपा, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट हे तिन्ही महाराष्ट्राचे शत्रू आहेत. या तिन्ही शत्रूंना जे अप्रत्यक्षपणे मदत करतात, ते सुद्धा महाराष्ट्राचे शत्रू होऊ शकतात. कोण निवडणूक लढतंय हे आधी स्वत: जाहीर करायला हवे. बातम्यांवरुन आम्हाला भूमिका ठरवता येणार नाही," असंही राऊत म्हणाले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group