दैनिक भ्रमर : आगामी महापालिका निवडणुका तोंडावर आहेत. मुंबई महापालिकेची निवडणूक वर्षा अखेरीस किंवा पुढच्या वर्षाच्या सुरुवातीस होण्याची शक्यता आहे. त्यासाठी सगळेच पक्ष कामाला लागले आहेत. या निवडणुकीत उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती होण्याची दाट शक्यता आहे. दोन ठाकरेंमधील दुरावा कमी झाला आहे. ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा सुरु असताना मनसे प्रमुख राज ठाकरेंनी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज नेते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली.
या बैठकीतून त्यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी राज यांनी केलेल्या विधानांमधून शिवसेना उबाठा आणि मनसे यांच्या युतीचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. या बैठकीत राज ठाकरेंनी केलेली दोन विधानं महत्त्वाची आहे. मुंबईत केवळ मनसे अन् शिवसेना उबाठाच्या कार्यकर्त्यांची तळागाळात ताकद आहे. अन्य पक्षांची मुंबईत तितकीशी ताकद नाही, असं राज ठाकरे नेते आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले. या विधानांमधून राज यांनी युतीचे स्पष्ट संकेत दिल्याची चर्चा आहे.
गट अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीच्या कामाला लागावं. मनसेच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मतदारयाद्या तपासाव्यात अशा सूचना राज ठाकरेंनी आज झालेल्या बैठकीत दिल्या. मुंबईतील मराठीबहुल भागांमध्ये ठाकरे बंधूंची ताकद आहे. विधानसभा निवडणुकीत उद्धवसेनेचा राज्यभरात धुव्वा उडाला. त्यांचे केवळ २० उमेदवार विजयी झाले. पण यातील निम्मे उमेदवार मुंबईतील आहेत. तर राज यांच्या मनसेला राज्यभरात केवळ १.५५ टक्के मतदान झालं. पण मुंबईत त्यांनी १४ टक्के मतं घेतली. त्यामुळे ठाकरेंची ताकद विधानसभेला मुंबईत दिसली आहे.