अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना हैराण करून सोडले. कर्जमाफी करावी यामागणीसाठी एकीकडे बच्चू कडू चांगलेच आक्रमक झाले असताना माजी मुख्यमंत्री तथा विधानपरिषदेचे आमदार उद्धव ठाकरे यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. शेतकऱ्यांना फसवण्याचा खेळ बंद करा, असेही ठाकरेंनी सरकारला सुनावले आहे.
कर्जाच्या डोंगराखाली शेतकरी खचला आहे. निसर्ग कोपलाच आहे. त्यात संवेदना नसलेल्या सरकारचा तुघलकी कारभार चालू आहे. अशा अस्मानी आणि सुलतानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा सरकारने लोणकढी थाप मारून वेळ काढायचा प्रयत्न केला आहे, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला आहे. तसेच कर्जमाफीसाठी आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांना जे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे त्यातून पुढील प्रश्नांची उत्तरे मिळतील काय? 
शेतकऱ्यांची दैनावस्था समोर दिसत असताना तुमची परदेशी समिती नेमका कसला अभ्यास करून अहवाल देणार? पुढच्या वर्षी जूनमध्ये जर खरंच कर्जमाफी होणार असेल तर आत्ताच्च्या कर्जाचे हप्ते भरायचे का? पुढील वर्षी जुनच्या कर्जमाफीत हे हप्ते माफ होणार असतील तर ते का भरायचे? ते न भरता शेतकऱ्यांना रब्बीसाठी कर्ज मिळणार आहे का? जर नव्याने कर्ज मिळणार असेल तर ते देखील माफ होणार का? या प्रश्नांची उत्तरे कोण देणार? असे अनेक सवाल उद्धव ठाकरेंनी केले आहेत.