भाजप खासदाराचा ठाकरे बंधूंवर घणाघात ; म्हणाले , “महाराष्ट्र आमच्या....
भाजप खासदाराचा ठाकरे बंधूंवर घणाघात ; म्हणाले , “महाराष्ट्र आमच्या...."
img
Dipali Ghadwaje
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मराठी भाषा आणि हिंदी सक्तीविरोधातील भूमिका घेतल्यानंतर भाजपकडून जोरदार प्रतिहल्ला सुरू झाला आहे. भाजपचे झारखंडचे खासदार निशिकांत दुबे यांनी महाराष्ट्राविरोधात गरळ ओकत संपूर्ण वाद पेटवून दिला आहे.

“महाराष्ट्रात एकही उद्योग नाही, आमच्या पैशांवर जगता आणि वर दादागिरी करता”, अशी जहरी टीका त्यांनी ठाकरे बंधूंवर केली आहे.

दुबे यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना अनेक गंभीर आरोप केले. त्यांनी म्हटलं की, “महाराष्ट्रात टाटा, बिर्ला, रिलायन्ससारखी नावं असली तरी कारखाने नाहीत. टाटांनी पहिला कारखाना बिहारमध्ये उभारला, रिलायन्सची रिफायनरी गुजरातमध्ये आहे. खनिज खाणी झारखंड, ओडिशा, मध्य प्रदेशमध्ये आहेत. मग महाराष्ट्र काय देतो देशाला?”

राज आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना दुबे म्हणाले, “तुम्ही फक्त उत्तर भारतीयांवर टीका करता. मग मुंबईतील तमिळ, तेलुगू आणि उर्दू भाषिकांबद्दल काहीच बोलत नाही. जर हिंमत असेल तर माहीमच्या दर्ग्यासमोर जाऊन तिथल्या हिंदीभाषिकांवर कारवाई करून दाखवा. तेव्हा मान्य करेन की तुम्ही खरे बाळासाहेबांचे वारस आहात.”

दुबे यांच्या या वक्तव्यामुळे ठाकरे बंधूंच्या आगामी महापालिका निवडणुकीसाठी होऊ घातलेल्या युतीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आक्रमक रणनीती आखल्याचे स्पष्ट होते.

विशेषतः उत्तर भारतीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपने उत्तर भारतातील खासदारांना मैदानात उतरवलं आहे.

“आम्ही मराठी स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान करतो, पण आज महाराष्ट्रात केवळ व्होटबँकेचं राजकारण सुरू आहे,” असे म्हणत दुबे यांनी ठाकरे बंधूंना थेट उद्देशून म्हटलं की, “तुमचं राजकारण खालच्या दर्जाचं आहे. केवळ इमोशनल भाषण करून मराठी जनतेला चिथवण्याचा प्रयत्न सुरू आहे.”

दुबे यांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या वादळाची चाहूल लागली आहे.

सोशल मीडियावर याविषयी तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, अनेक मराठी नेत्यांनी दुबे यांचा निषेध नोंदवायला सुरुवात केली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group