शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील अनेक आजी माजी पदाधिकाऱ्यांनी महायुतीत प्रवेश केला आहे. मात्र आता भाजपचे काही पदाधिकारी ठाकरे गटात प्रवेश करत असल्याचे समोर आले आहे. उद्धव ठाकरेंनी एका युवा नेत्याला आपल्या पक्षात प्रवेश दिला आहे. त्यामुळे हा भाजपासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
उद्धव ठाकरे यांनी डोंबिवलीत भाजपला धक्का दिला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे निकटवर्तीय असलेल्या योगेंद्र भोईर यांना आपल्या पक्षात प्रवेश दिला आहे. योगेंद्र भोईर हे डोंबिवलीतील भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष होते. योगेंद्र यांनी आज पत्नी ट्विंकल भोईर यांच्यासह आज मातोश्री येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला.
‘बदल हा निसर्गाचा नियम आहे. त्याप्रमाणे प्रगतीसाठी आपल्याला नेहमीच स्वतःमध्ये बदल करत राहावे लागतात. माझ्या आयुष्यतील कठीण असा निर्णय मला आज घ्यावा लागला तो म्हणजे भाजप परिवारामधून आज मी बाहेर पडलो आहे. माननीय रवींद्र चव्हाण साहेब माझे दादा यांच्या मागर्दर्शनाखाली नेहमीच नवनवीन गोष्टी आयुष्यात शिकायला मिळाल्या. त्यांचा सहवास मला माझ्या राजकीय वाटचालीमध्ये लाभला हा आनंद कायम मला प्रेरणा देत राहील.
मात्र ते म्हणतात ना कुठे पोहचायचं असेल तर कुठून तरी निघावं लागत म्हणूनच माझ्या वैयक्तीत पातळीवर निर्णय घेऊन मी भाजपाची साथ सोडत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये येणाऱ्या काळामध्ये माझी राजकीय वाटचाल सुरु ठेवणार आहे.’ अशी योगेंद्र भोईर यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.