निवडणुकी आधीच भाजपला मोठा धक्का
निवडणुकी आधीच भाजपला मोठा धक्का
img
Dipali Ghadwaje
डोंबिवलीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. कल्याण-डोंबिवलीचे माजी स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे यांनी भाजपच्या सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. म्हात्रे यांच्यासहित त्यांची पत्नी कविता आणि दोन प्रभागातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी राजीनामा दिला आहे.

दरम्यान विकास कामे होत नाही, निधी मिळत नाही, असे म्हणत विकास म्हात्रे यांनी भाजपची साथ सोडली आहे. विकास म्हात्रे यांच्या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. 

विकास म्हात्रे यांनी पत्राद्वारे कळवत भाजपची साथ सोडली आहे. म्हात्रे यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याने निवडणुकीआधी भाजपला मोठा धक्का बसला असल्याचं बोललं आहे. केंद्रात आणि राज्यात सत्ता असताना विकासकामे होत नसल्याने नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याची खंत व्यक्त केली आहे.   
 
विकास म्हात्रे यांनी पत्रात काय म्हटलं आहे?
या राजीनामा पत्रात विकास म्हात्रे यांनी गरीबाचा पाडा आणि राजूनगर परिसरात अपुऱ्या निधीमुळे विकास खुंटला आहे. वारंवार पत्रव्यवहार करुन देखील दखल घेतली जात नाही. अनेक रस्त्याची कामे अपुरी आहेत. पावसाळ्यात रस्त्यावर खडड्यांचे साम्राज्य पसरले आहे ,अपुरा पाणी पुरवठ्या मुळे नागरिक त्रस्त आहेत. या समस्यांबाबत वरिष्ठांशी लेखी व तोंडी पाठपुरावा करुन अद्याप दखल घेतली गेली नाही. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. त्यामुळे पदाधिकारी आणि कार्यकर्ते पक्षाप्रति नाराज झाले आहेत, असं त्यांनी पत्रात म्हटलं आहे.

'प्रभागातील नागरीक उघडपणे बोलू लागले आहे की इतर प्रभागात विकास कामे झपाट्याने होतात. आपल्या पक्षाचे केंद्रात आणि राज्यात सरकार असताना आपल्या प्रभागाचा विकास का होत नाही असा सवाल केला जात असल्याचे म्हटले आहे.

डोंबिवली हा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचा मतदारसंघ आहे. भाजपच्या मंत्र्यांच्या मतदारसंघात भाजप विरोधात भाजपचेच लोकप्रतिनिधी नाराज असल्याने म्हात्रे यांचा राजीनामा हा भाजपासाठी मोठा धक्का असल्याचे बोललं जात आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group