ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाला धक्का बसलाय. पुण्यातील पिंपरी चिंचवड शहरात भाजप युवा मोर्चातील अंतर्गत वाद उफाळून आलाय. या वादाच्या पार्श्वभूमीवर भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांच्या अडचणीत वाढ झाली असून, तक्रारीवरून त्यांच्या विरोधात चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाजप युवा प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अनुप मोरे यांच्याविरोधात पिंपरी चिंचवड शहरातील चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप युवा मोर्चाच्या प्रदेश सचिव तेजस्विनी कदम यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, अनुप मोरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तेजस्विनी कदम यांनी त्यांच्या तक्रारीत म्हटले की, एका मित्राच्या बंगल्यावर गेले असता बंगल्याबाहेर जमलेल्या अनुप मोरे यांच्या समर्थकांनी आपल्याला जीवे मारण्याची धमकी देत मारहाण केली. फक्त हेच नाही तर मला पोलिसांसमोरही मारहाण करण्यात आली. तेजस्विनी कदम यांनी दिलेल्या तक्रारीनंतर अनुप मोरे यांच्या समर्थकांवर गुन्हे दाखल करण्यात आली. मात्र, अनुप मोरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.
आपल्या विरोधात सर्व गोष्टी अनुप मोरे हाच करत असून गुन्हात त्याचे नाव का नाही? आणि त्याच्यावर गुन्हा दाखल का नाही? असा प्रश्न तेजस्विनी कदम यांनी उपस्थित करत पोलिसांना जाब विचारला. त्यावेळी अनुप मोरे यांचे नाव घ्यायचे राहिल्याचे सांगत दुसऱ्या दिवशी अखेर अनुप मोरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तेजस्विनी कदम यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर अनुप मोरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला.
अनुप मोरे आणि तेजस्विनी कदम यांच्यात अनेक वर्षांपासून मैत्रीपूर्ण संबंध असल्याचे जाहीर आहे. मात्र, अचानक असे काय झाले की, दोघांमधील वाद इतका टोकाला गेला यावरून विविध चर्चा सुरू आहे. आपण घटनास्थळी नव्हतो, बदनामी करण्याच्या हेतुने आपल्यावर खोटे आरोप केले जात असल्याचे मोरे यांनी म्हटले आहे.