मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला दणदणीत यश मिळालं आहे. 288 पैकी 230 जागांवर महायुतीचा विजय झाला आहे. राज्यातील मतदारांनी पुन्हा महायुतीलाच कौल दिला असून महायुतीचा दणदणीत विजय झाला आहे.
भारतीय जनता पक्ष हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर, दुसरीकडे महाविकास आघाडीला पराभवाचा मोठा धक्का बसला आहे. दरम्यान राज्यात आता भाजप महाविकास आघाडीला आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत आहे. भाजपकडून मिशन लोट्स सुरू करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. याचा परिणाम केंद्रातील समीकरणावर होणार आहे.
भाजपमधील वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप महाविकास आघाडीला धक्का देण्याच्या तयारीत आहे. विधानसभेत मिळालेल्या पराभवाच्या धक्क्याने महाविकास आघाडीने आत्मविश्वास गमावल्याची स्थिती आहे. तर, भाजप नेत्यांचा आत्मविश्वास उंचावला आहे. विधानसभेतील दारुण पराभवानंतर महाविकास आघाडीचे काही खासदार भाजपच्या संपर्कात आले आहेत. लवकरच महाविकास आघाडीतील काही खासदार राजीनामा देण्याची शक्यता आहे. हे खासदार राजीनामा देऊन पुन्हा भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडीला धक्का देत भाजप आपल्याकडे काही खासदारांना ओढण्याच्या तयारीत आहेत. महाराष्ट्रात सध्या महायुतीला अनुकूल वातावरण आहे. त्याचाच फायदा घेत मविआच्या खासदारांना आपल्याकडे खेचत त्यांना पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचे नियोजन असल्याचे म्हटले जात आहे.
या खासदारांना विजयी केल्यानंतर भाजपची लोकसभेतील ताकद वाढवण्याचा प्रयत्न आहे. भाजपची केंद्रातील सत्ता ही चंद्राबाबू नायडू यांचा तेलगू देसम पक्ष आणि नितीश कुमार यांच्या नितीश कुमार यांच्या जेडीयूच्या पाठिंब्यावर आहे. केंद्रात संख्याबळ वाढल्यास भाजपचे मित्र पक्षांवरील अवलंबित्व कमी होणार आहे.