नाशिक : महायुती सरकारमधील कलंकित आणि भ्रष्टाचारी मंत्र्यांच्या हकालपट्टीसाठी शिवसेना ठाकरे गट रस्त्यावर उतरला आहे. आज शिवसेना ठाकरे गटाकडून राज्यव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली. या पार्श्वभूमीवर राज्यात ठिकठिकाणी आंदोलन केले जात आहे. नाशिकमध्येही ठाकरे गटाच्यावतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी सुरूवातीला माजी महापौर विनायक पांडे हे अनुपस्थित असल्याने एकच चर्चा रंगली होती मात्र काही वेळाने पांडे आंदोलन स्थळी दाखल झाल्याचे दिसून आले.
काही दिवसांपूर्वी नाशिक येथे शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या या बैठकीत एम.डी ड्रग्जच्या मुददयावरून पक्षाचे संपर्कप्रमुख जयंत दिंडे यांनी भाष्य करत विधानसभेत हा मुददा उचलून धरायला हवा होता असे भाष्य केले. यावरून माजी महापौर विनायक पांडे आणि दिंडे यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाल्याचे दिसून आले.
पांडे यांनी दिंडेंच्या वक्तव्यावर नाराजी दर्शवत आम्ही देखील अनेक वर्षांपासून शिवसेनेत कार्यरत आहोत जर विधानसभेत आपण कमी पडलो असतो तर अजय बोरस्ते, सुनिल बागुल यांच्यापेक्षा अधिक मते गीतेंना कशी मिळाली असा सवाल उपस्थित केला. यानंतर पांडे बैठीतून निघून गेले. यानंतर पांडे नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले होते.
आंदोलन शालिमार येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ पोहोचले त्यानंतर विनायक पांडे देखील त्याठिकाणी हजार झाले. या मोर्चावेळी शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. मात्र सुरुवातीला माजी महापौर विनायक पांडे उपस्थित नसल्याने उपस्थितांमध्ये पांडेंच्या नाराजीबाबत चर्चा सुरू होती. मात्र पांडेंना पाहिल्यानंतर या चर्चांना विराम मिळाला.