नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी) - व्याजाने घेतलेल्या पैशांच्या वसुलीसाठी पोलीस उपनिरीक्षक असलेल्या महिलेकडे घराचे साठेखत व मुखत्यारपत्र लिहून व नोंदवून देण्याच्या मोबदल्यात खंडणी मागणार्या खासगी सावकारासह दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी महिला  या पोलीस उपनिरीक्षक आहेत. त्यांना आर्थिक अडचण निर्माण झाल्यामुळे पैशांची गरज होती. त्यामुळे त्या खासगी सावकर विकी कुमावत याला भेटल्या. त्यांनी कुमावत कडून 10 लाख रुपये व्याजाने घेतले होते. त्याबदल्यात 42 हजार रुपये दरमहा व्याजाची रक्कम ठरली. 
त्याप्रमाणे फिर्यादी महिलेने कुमावतला 1 लाख 26 हजार रुपये हे मार्च ते मे या तीन महिन्यांपोटी दिले. त्याबदल्यात आरोपीने फेब्रुवारी 2025 च्या पहिल्या आठवड्यापासून ते दि. 29 ऑक्टोबर 2025 या कालावधीत नाशिक येथील दुय्यम निबंधक कार्यालय-2 व मुक्तिधामसमोरील कोर्ट व येथे आरोपी खासगी सावकार विकी कुमावत (रा. विठ्ठल मंगल कार्यालयाजवळ, जेलरोड, नाशिकरोड), सोनाली संदीप जोधवाळ (रा. जावेद शो कृपा कलेक्शन, जेलरोड), अनंता पवार व देवयानी पिसे (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) यांनी त्यांच्याकडे सावकारीचे कोणतेही लायसन नसताना फिर्यादी यांच्या साई संजीवनी सहकारी गृहनिर्माण संस्था (म) इमारत क्रमांक 2, बोधलेनगर, नाशिक येथे फिर्यादी यांचा एक फ्लॅट आहे.
या फ्लॅटचे मूळ खरेदी खत, सोसायटी शेअर सर्टीफिकेट, बिल्डिंगची एनओसी, अशी कागदपत्रे व फ्लॅट क्रमांक 23 हा गहाण ठेवून घेऊन, तसेच रजिस्टर साठेखत व रजिस्टर जनरल मुखत्यारपत्र लिहून व नोंदवले. आरोपींनी फिर्यादीकडून अधिकचे 2 लाख 70 हजार रुपये घेऊन एकूण 3 लाख 96 हजार 500 रुपये घेतले आहेत. मागितलेले पैसे दिले नाही, तर गहाण खत केलेल्या मालमत्तेचा कब्जा घेऊन घर विक्री करुन महिलेला बेघर करण्याची धमकी देत शिवीगाळ केली.
या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात चार खासगी सावकारांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र माळी करीत आहेत.