सिन्नर तालुक्याच्या पूर्वभागातील पंचाळे व शहा परिसरात बिबट्याना मोठा धुडगूस घातला होता. या बिबटयामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. गेल्या दहा ते बारा दिवसापासून पंचाळे व परिसरात नरभक्षक बिबट्या रेस्क्यू करण्यासाठी सुरू असलेल्या वनविभाग अधिकारी व कर्मचारी यांना अखेर यश मिळाले आहे.
काही दिवसांपूर्वी मीठसागरे शिवारातील पिंजर्यात एक बिबट्या जेरबंद झाला. मात्र परिसरात अजूनही ७ ते ८ बिबटे असल्याचा अंदाज नागरिकांकडून व्यक्त होत होता. आता आणखी एक बिबट्या जेरबंद झाल्याने स्थानिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.
चांगदेव लक्ष्मण जाधव यांच्या वस्तीवर डांबर नाला देवपूर शिवार येथे शुक्रवारी सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास पंचाळे व परिसरात भयग्रस्त परिस्थिती निर्माण केलेल्या नरभक्षक बिबट्यास वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी बेशुद्ध करून रेस्क्यू करत जेरबंद केले.
नाशिक पश्चिम उपवनसंरक्षक सिद्धेश सावर्डेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सिन्नर वनपरिक्षेत्र अधिकारी हर्षल पारेकर व नाशिक सहाय्यक वनसंरक्षक कल्पना वाघेरे, प्रशांत खैरनार, निलेश कांबळे यांच्यासमवेत इगतपुरी, त्र्यंबक, संगमनेर, नाशिक, पेठ,बाऱ्हे, ननाशी हरसूल , निफाड, बोरिवली, सिन्नर व पेठ वन परिक्षेत्र व नाशिक विभागीय अधिकारी यांच्यासमवेत मोबाईल स्कॉड नाशिक असे जवळपास १३० ते १५० कर्मचाऱ्यांच्या रेस्क्यू टीमने ही कामगिरी यशस्वीपणे राबविली.