विहितगावला प्राणघातक हल्ला; गोळीबारात एक जखमी
विहितगावला प्राणघातक हल्ला; गोळीबारात एक जखमी
img
Chandrakant Barve
नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी) :- एक दीड वर्षापूर्वी हातउसनवार घेतलेल्या पैशाच्या वादातून दोन मित्रांमध्ये काल रात्री वादावादी झाली. त्यात पाच जण गंभीर जखमी झाले असून, एकाच्या मांडीला बंदुकीची गोळी लागली, तर एकाच्या पायाला गोळी चाटून गेली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की गणेश जमधडे व स्वप्नील हांडोरे हे दोघे जण मित्र होते. स्वप्नील हांडोरे याने एक ते दीड वर्षापूर्वी गणेश जमधडे याच्याकडून दीड लाख रुपये हातउसने घेतले होते. दोघे मित्र असल्याने जमधडे याने पैसे मिळतील या आशेने त्याने त्याकडे थोडे दुर्लक्ष केले; मात्र मुदत संपूनही स्वप्नील हांडोरे हा हातउसनवार घेतलेले पैसे देत नव्हता. याच आर्थिक वादातून ५ सहा महिन्यांच्यापासून दोघांच्या मैत्रीचे रुपांतर दुश्मनित झाले. 

गणेश जमधडे याने पैसे वसुलीसाठी स्वप्नीलकडे तगादा लावला; मात्र तो त्याला प्रतिसाद देत नसल्याने त्याला राग अनावर झाला. दरम्यान, काल रात्री स्वप्नील हांडोरे, त्याचा भाऊ दर्शन हांडोरे व विकी हांडोरे हे तिघे जण विहितगावातील मथुरा चौकात बसलेले होते. याबाबतचा सुगावा गणेश जमधडे याला लागला. त्यानंतर त्याने आपले मित्र प्रतिक वाकचौरे, आकाश पवार, सौरभ लोंढे यांना सोबत घेऊन मथुरा चौकात येऊन हांडोरे बंधूंवर धारदार शस्त्राने हल्ला केला. त्यानंतर गणेशने केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तरादाखल हांडोरे बंधूंनीही त्यांच्यावर हल्ला केला. 

या हल्ल्यात गणेश जमधडे सोबत आलेल्या आकाश पवारच्या मांडीला बंदुकीतून झाडण्यात आलेली गोळी लागली. तर स्वप्नील हांडोरेच्या पायालाही बंदुकीची गोळी चाटून गेली. यावेळी परिसरात दोन्ही गटांकडून मोठ्या प्रमाणात गदारोळ घालून आरडाओरडा करण्यात आल्याने मथुरा चौकातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. दरम्यान या दोन गटामध्ये झालेल्या हल्ल्यामध्ये ५ जण गंभीर जखमी झाले असून, त्यातील दोघा जणांवर खासगी रुग्णालयात, तर एका जणावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

या हल्ल्याची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, उपनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही गटांतील गणेश जमधडे व विकी हांडोरे यांना ताब्यात घेतले आहे, तर रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या आरोपींना वैद्यकीय सूत्रांच्या माहितीनुसार ताब्यात घेण्यात येणार आहे. याप्रकरणी बंदुकीतील मारलेली गोळी कोणी झाडली.

याचा तपास पोलिसांनी सुरू केला असून, गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी इतर संशयितांचा शोध घेत आहेत.  काल रात्री प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम उपनगर पोलीस ठाण्यात सुरू होते. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group