नाशिकरोड (प्रतिनिधी):- शौचास बसलेल्या मुलावर हल्ला करण्याच्या तयारीत असलेल्या मादी जातीचा बिबट्या वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात अडकला.मात्र नर बिबट्या पिंजऱ्याभोवती असल्याने पिंजरा काढणे वन अधिकारयांना मुश्कील झाले होते.
मनोहर गार्डन मागे शब्बीर सय्यद यांचा आर्टलरी सेंटर च्या तारे जवळ मळा आहे.५ सप्टेंबर रोजी सायंकाळी च्या सुमारास सय्यद यांच्या कुटूंबातील महिला आपल्या दोन-तीन वर्षाच्या मुलाला घरा बाहेर शौचास बसवले होते. त्या महिला मुला जवळ थांबून असल्याने त्याना बाजूच्या झाडाझुडुपा मधून काही येत असल्याची चाहूल झाली.
त्यांनी खात्री केली असता दबक्या पाऊलानी बिबट्या येत असल्याचे दिसले, जोरात आरडाओरड करीत महिलेने शौचास बसलेल्या मुलास उचलून घरात गेल्या. वन अधिकारी उत्तम पाटील यांना माहिती समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पाहणी केली असता मनोहर गार्डन मधील "शारदा"बंगल्यातील श्वानाचे अवशेष त्याना दिसून आले. आणि तेथे पिंजरा लावला.
आज सकाळी शब्बीर सय्यद यांच्या लक्षात आले की बिबट्या पिंजऱ्यात अडकला. शिवसेनेचे महिला पदाधिकारी योगिता गायकवाड, किरण गायकवाड, योगेश देशमुख, ऍड.नितीन पंडीत यांनी वन विभागाला माहिती दिली. वन अधिकारी पिंजऱ्या कडे जात असतांना पिंजऱ्याच्या बाहेर बिबट्या घिरट्या घालीत असल्याचे लक्षात आले. मोठ्या शिताफीने वन अधिकारी उत्तम पाटील यांनी नागरिकांच्या मदतीने पिंजरा हलवला आणि काही तासात पुन्हा तिथे पिंजरा लावला.
वन परिक्षेत्र अधिकारी वृषाली गाडे, वन अधिकारी अनिल आहिरराव, उत्तम पाटील,वन मजूर अंबादास जगताप, निवृत्ती कोरडे वाहन चालक परवीन राठोड आदी मोहिमेत सहभागी झाले होते.