एका खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलत असताना शिवसेना (उबाठा) नेते आणि खासदार संजय राऊत चांगलेच कडाडताना दिसले. यावेळी त्यांनी मुंबई महापौर , शिवसेना शिंदे गट , आणि भाजपवर सणसणीत टीका केली. मुंबईला कमकुवत करण्याचे कारस्थान गेल्या काही वर्षांपासून दिल्लीतून रचले जात आहे. जर आज निवडणूक आयोग आणि पोलीस माझ्या हातात असते, तर मी भाजपचे चार तुकडे केले असते," असे आक्रमक होत संजय राऊत म्हणाले.
पुढे राऊत यांनी मुंबईच्या भवितव्याबद्दल भीती व्यक्त करताना सांगितले की, "मुंबईचे डेथ वारंट दिल्लीतून निघाले आहे आणि ते आपल्याला रोखावेच लागेल. ठाकरे बंधूंनी (उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे) जे सांगितले तेच सत्य आहे आपल्याला मुंबई वाचवायची आहे. शिंदे यांची शिवसेना ही अमित शहा यांनी बनवलेली पार्टी आहे. जोपर्यंत अमित शहा आहेत, तोपर्यंतच यांची दुकानदारी सुरू राहणार आहे.
मुंबईत शिवसेनेने आतापर्यंत २३ महापौर दिले आहेत. आगामी निवडणुकीतही मुंबईत मराठी महापौरच होईल. 'हिंदू महापौर' की 'मराठी महापौर' हा वाद निरर्थक आहे, कारण मराठी माणूस हा हिंदूच आहे, असे राऊत यांनी स्पष्ट केले.
महाविकास आघाडी म्हणून आम्ही लोकसभा आणि विधानसभेत काँग्रेससोबत होतो आणि महापालिकेतही आम्ही एकत्र आहोत. आम्ही सगळे मिळून मुंबईवर पुन्हा भगवा फडकवू. तुम्हाला हिंमत असेल तर वेगळी मुंबई बनवून दाखवा. जिथे ठाकरे आहेत, तिथेच खरी शिवसेना आहे, असे आव्हानही त्यांनी सत्ताधाऱ्यांना दिले.