मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते तसेच खासदार संजय राऊत यांची काल रात्री उशिरा एका खासगी कार्यक्रमात भेट झाली. संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस हे साधारण २० मिनिटे एकमेकांशी चर्चा करत होते. यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.
मंगळवारी रात्री उशिरा मुंबईतील एका खासगी कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत एकत्र आले होते. याचा एक फोटोही समोर आला आहे. या फोटोत संजय राऊत हे तोंडाला मास्क लावून बसल्याचे पाहायला मिळत आहेत. तर देवेंद्र फडणवीस हे त्यांच्याशी चर्चा करत असल्याचे दिसत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी संजय राऊत यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच त्यांच्या उपचाराबाबतही माहिती घेतली. एकीकडे राजकीय टीका-टिप्पणीमुळे सध्याचे वातावरण तापलेले असताना राज्याच्या दोन प्रमुख नेत्यांच्या या भेटीमुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. ही भेट केवळ औपचारिक होती की यामागे काही वेगळा हेतू दडलेला आहे, असेही बोललं जात आहे.