देवेंद्र फडणवीसांनी सांगितला महापालिका निवडणुकीचा प्लान ; म्हणाले,
देवेंद्र फडणवीसांनी सांगितला महापालिका निवडणुकीचा प्लान ; म्हणाले, "ज्या ठिकाणी युती होणार नाही, त्या ठिकाणी..."
img
Dipali Ghadwaje
चार महिन्याच्या आत महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या, असे कोर्टाने आदेश देताच राज्यात निवडणुकीचे वारे वाहू लागलेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही महायुतीच्या रणनीतीवर भाष्य केलेय. ते पुण्यामध्ये बोलत होते. ज्या ठिकाणी युती होणार नाही, त्या ठिकाणी वेगळं लढू असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात बोलताना आगामी महापालिका निवडणुकीत महायुतीबाबत महत्त्वाचे वक्तव्य केले. महायुती म्हणूनच आम्ही निवडणुका लढवू. आम्ही तिन्ही पक्ष एकत्र आहोत. काही अपवादात्मक ठिकाणी तुल्यबळ उमेदवार असतील तर समजुतीने वेगळे लढू, पण युती होणार नाही, त्या ठिकाणी वेगळं लढू. एकमेकांवर टीका न करता सकारात्मक प्रचार करू, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

महापालिका निवडणुका वेळेत घेण्यासाठी निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे. ज्या भागात पावसाचा प्रभाव जास्त आहे, तिथे गरज भासल्यास १५ दिवसांची मुदतवाढ मागितली जाऊ शकते,असेही त्यांनी सांगितले.

जास्तीत जास्त ठिकाणी महायुती एकत्र लढेल. कार्यकर्त्यांची इच्छा स्वाभाविक आहे. ते वर्षानुवर्षे काम करतात, त्यांना संधी मिळावी असे वाटणे साहजिक आहे. आमच्या तिन्ही पक्षांना हेच वाटते. पण काही ठिकाणी युती शक्य नसल्यास निवडणुकीनंतर युती होऊ शकते, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेळेत होतील, यावरही त्यांनी भर दिला.
इतर बातम्या
Join Whatsapp Group