राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे आश्चर्यजनक निकाल पाहायला मिळत आहेत. कुठे अवघ्या एका मताने अपक्ष विजयी झाला आहे तर कुठे नणंदेने भावजयीचा पराभव केला. परभणीत देखील आश्चर्यजनक निकाल पहायला मिळाला आहे. परभणीचे नेते तथा भाजपचे माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांच्या कुटुंबातील तीन जण या निवडणुकीमध्ये उभे होते. मात्र तिन्ही जागांवर त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे.
सुरेश वरपूडकर यांचे चिरंजीव समशेर वरपूडकर हे शिंगणापूर जिल्हा परिषद गटातून उभे होते त्या ठिकाणी मशाल या चिन्हावर उभे असलेले पांडुरंग खिल्लारे यांनी समशेर वरपूडकर यांचा पराभव केला. तर कन्या सोनल देशमुख या झरी जिल्हा परिषद गटातून मशालीच्या चिन्हावर उभ्या होत्या. मात्र, सोनल वरपूडकर यांना पराभव पत्कारावा लागला आहे, भाजपचे उमेदवार दिलीप देशमुख यांनी त्यांचा पराभव केलाय.
सोबतच वरपूडकर यांच्या सुनबाई प्रेरणा वरपूडकर या दैठणा जिल्हा परिषद गटातून निवडणुकीसाठी उभ्या होत्या, त्या ठिकाणीही काँग्रेसच्या ज्योत्स्ना गणेश घाडगे यांनी त्यांचा पराभव केलाय. त्यामुळे वरपूडकर यांचे घरातील तीनही उमेदवार पराभूत झाले आहेत.