महापालिका निवडणुकांचा रणसंग्राम अखेर संपन्न झाला. आता आपल्या प्रभागात नेमका नगरसेवक कोण असणार हा प्रश्न देखील नाही कारण महापालिकांचा निकालही समोर आला. आता प्रतीक्षा आहे ती महापौरपदाची. बरं महापालिका निवडणुकांसाठी उत्सुकांची किती झुंबड उडाली होती हे आपण सर्वानीच पाहिलं. उमेदवारी मिळण्यासाठी पक्षांतरे झाली, फोडाफोडीचे राजकारण झाले, भांडणे झाली, मारहाण झाली. शेवटी निवडणूक झाल्या , निकालही आले. पण ज्या नगरसेवक पदासाठी एवढे जीवाचे रान केले जात होते त्या नगरसेवकाला नेमका पगार किती असतो हे तुम्हांला माहिती आहे का ? नाही ! तर मग जाणून घ्या.
राज्यातील सर्वच नगरसेवकांना सारखा पगार नसतो. महानगरपालिकांच्या उत्पन्नानुसार आणि विस्तारानुसार नगरसेवकांचे मानधन ठरलेले असते. यात देशातील सर्वात श्रीमंत पालिकेचे (मुंबई) नगरसेवक आघाडीवर असले, तरी इतर शहरांतील आकडाही कमी नाही.
राज्यातील महापालिकांचे वर्गीकरण 'अ+' पासून 'ड' श्रेणीपर्यंत करण्यात आले आहे. त्यानुसार नगरसेवकांच्या बँक खात्यात दरमहा ठराविक रक्कम जमा होते. नगरसेवकांना मिळणारे मानधन जरी कमी दिसत असलं तरी प्रत्यक्षात त्यांना मिळणारे फायदे खूप असतात. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत हजेरी लावण्यासाठी प्रत्येक नगरसेवकाला ४०० रुपये स्वतंत्र मिटींग भत्ता मिळतो. राज्यात एकूण २,८६९ नगरसेवक असून, केवळ या सभेद्वारे वर्षाला १.३७ कोटी रुपये खर्च होतात.
त्यासोबतच नगरसेवकांना नवीन सिम कार्ड आणि त्यांच्या मोबाईलचे मासिक बिल संबंधित महानगरपालिकाच भरते. महापौर आणि इतर महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या गाड्यांचे पेट्रोल/डिझेल आणि त्यांच्या ड्रायव्हरचा पगारही पालिकेच्या तिजोरीतूनच दिला जातो.
29 महानगरपालिकांकडून नगरसेवकांना किती मानधन
महापालिका नगरसेवक मानधन
मुंबई 227 २५,००० रु.
नागपूर 151 २०,००० रु.
पुणे 165 २०,००० रु.
ठाणे 131 १५,००० रु.
पिंपरी-चिंचवड 128 १५,००० रु.
नाशिक 122 १५,००० रु.
नवी मुंबई 111 १०,००० रु.
कल्याण-डोंबिवली122 १०,००० रु.
वसई-विरार 115 १०,००० रु.
छ. संभाजीनगर 115 १०,००० रु.
मिरा-भाईंदर 95 ७,५०० रु.
भिवंडी-निजामपूर 90 ७,५०० रु.
मालेगाव 84 ७,५०० रु.
उल्हासनगर 78 ७,५०० रु.
पनवेल 78 ७,५०० रु.
धुळे 74 ७,५०० रु.
जळगाव 75 ७,५०० रु.
अहिल्यानगर 68 ७,५०० रु.
सांगली-मिरज-कुपवाड 78 ७,५०० रु.
सोलापूर 102 ७,५०० रु.
अमरावती 87 ७,५०० रु.
कोल्हापूर 81 ७,५०० रु.
नांदेड वाघाळा 81 ७,५०० रु
.
अकोला 80 ७,५०० रु.
लातूर 70 ७,५०० रु.
चंद्रपूर 66 ७,५०० रु.
जालना 65 ७,५०० रु.
इचलकरंजी 65 ७,५०० रु.
परभणी 65 ७,५०० रु.
29 महानगरपालिकांसाठी किती खर्च?
महाराष्ट्रातील सर्व महापालिकांच्या एकूण २,८६९ नगरसेवकांचा विचार केला, तर त्यांच्या केवळ मानधनासाठी दरमहा ३ कोटी ३४ लाख ५५ हजार रुपये खर्च होतात. वार्षिक विचार केल्यास हा आकडा ४० कोटी १४ लाख ६० हजार रुपयांच्या घरात जातो. हा सर्व पैसा जनतेने भरलेल्या करातून (Tax) खर्च केला जातो. लोकप्रतिनिधींच्या मानधनासाठी मात्र महापालिकांच्या तिजोऱ्या नेहमीच खुल्या असतात, हेच या आकडेवारीवरून स्पष्ट होते.