विधान परिषद निवडणूक शिंदेंचा 'प्लॅन बी' तयार; १० व्या उमेदवाराच्या एन्ट्रीने मविआची धाकधूक वाढणार?
विधान परिषद निवडणूक शिंदेंचा 'प्लॅन बी' तयार; १० व्या उमेदवाराच्या एन्ट्रीने मविआची धाकधूक वाढणार?
img
नितीशा कुलकर्णी









"बिनविरोध की रणसंग्राम? विधान परिषदेच्या ९ जागांसाठी राजकारण पेटले आहे. उपमुख्यमंत्र्यांचा 'दहावा' उमेदवार विरोधकांची मते फोडणार का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. भाजपचे धक्कातंत्र आणि मविआची बदलती समीकरणे; वाचा विधान परिषद निवडणुकीचे 'इनसाईड' अपडेट्स." राज्यात पुन्हा एकदा घडामोडींना वेग आला आहे.

विधान परिषदेच्या ९ जागांसाठी १२ मे रोजी मतदान होणार आहे. त्याआधी राजकीय समीकरणे जुळवाजुळव सुरू झाली आहे.

विद्यमान संख्याबळानुसार सत्ताधारी महायुतीला ८ आणि महाविकास आघाडीला १ जागा सहज मिळणे अपेक्षित आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भाजपचे वरिष्ठ नेते प्रयत्नशील असले तरी मात्र, शिवसेना शिंदे गटाने प्लॅन बी आखला असल्याची चर्चा आहे. शिंदे गट या निवडणुकीत १० उमेदवार उतरवण्याच्या तयारीत आहे.

महायुतीची जागांची गोळाबेरीज

विधान परिषदेच्या एका जागेसाठी २९ मतांचा कोटा आवश्यक आहे. भाजपने आपल्या संख्याबळानुसार ६ जागांवर दावा केला आहे. यामध्ये राम सातपुते, केशव उपाध्ये, माधवी नाईक यांसारख्या दिग्गज नावांची चर्चा असली तरी, राज्यसभा निवडणुकीप्रमाणेच भाजप पुन्हा एकदा 'धक्कातंत्र' वापरून अनपेक्षित नावांची घोषणा करण्याची दाट शक्यता आहे. सर्व जाती-धर्माचा समतोल साधत नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याचे संकेत मिळत आहेत.

एकनाथ शिंदेंची रणनीती आणि 'दहावा' उमेदवार

शिवसेनेकडे (शिंदे गट) असलेल्या ५७ आमदारांच्या संख्याबळामुळे त्यांच्या दोन जागा निवडून येण्यात कोणताही अडसर नाही. मात्र, नवव्या (किंवा दहाव्या) जागेसाठी उमेदवार उतरवून विरोधकांची मते फोडण्याची रणनीती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आखत असल्याची चर्चा आहे. यासाठी काँग्रेसच्या मतांवर डोळा ठेवण्यासोबतच, राष्ट्रवादीमधील फुटीचा फायदा घेण्याचाही प्रयत्न होऊ शकतो. शिवसेनेकडून नीलम गोऱ्हे, राजू वाघमारे, शायना एनसी यांच्या नावांची जोरदार चर्चा आहे.

राष्ट्रवादी आणि मविआची भूमिका 

अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला एक जागा येणार असून, अमोल मिटकरी, आनंद परांजपे, झिशान सिद्दिकी किंवा समीर भुजबळ यांच्यापैकी कोणाची वर्णी लागते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीत एकमत न झाल्यास या निवडणुकीचे चित्र पूर्णपणे बदलू शकते.

महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे यांना पुन्हा विधान परिषद उमेदवारीसाठी गळ घातली जात आहे. उद्धव ठाकरे यांनी मात्र, यावर कोणतेही भाष्य केले नाही. उद्धव ठाकरे उमेदवार नसतील तर काँग्रेस या जागेवर दावा सांगू शकते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह आणखी काही नावे चर्चेत आहेत.

भाजपने बिनविरोध निवडणुकीचा आग्रह शिंदे यांच्यासमोर कायम धरल्यास निवडणुकीतील घोडेबाजार टाळला जाईल, अशी चर्चा आहे. मात्र, दहावा उमेदवार रिंगणात आल्यास मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group