विधानपरिषद नवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणातील हालचालीना वेग आला आहे. याचदरम्यान आता राजकारणात शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट यांच्या एकत्रीकरणाच्या चर्चा सध्या सुरु आहेत.
विधानपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते तथा आमदार अंबादास दानवे यांच्या विधानाची राजकीय वर्तुळात एकचर्चा होत आहे. त्यांनी दोन्ही शिवसेनेच्या एकत्रिकरणावर महत्त्वाचं भाष्य केलं आहे. भविष्यात शिंदे आणि ठाकरे या दोन्ही शिवसेना गटांनी एकत्र यायला हवे, एकत्र येऊन काम करायला हवे, असे मत दानवे यांनी व्यक्त केले आहे. त्यांच्या या विधानाचे आता अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत. भविष्यात खरंच शिवसेनेचे दोन्ही गट एकत्र येणार का? ते शक्य आहे का? असे विचारले जात आहे. यावरच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट उत्तर दिले आहे. त्यांच्या उत्तराचीही आता सगळीकडेच चर्चा होत आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांसाठीच्या विधानपरिषद निवडणुकीची सध्या धामधूम सुरू आहे. ठाण्यात महायुतीतर्फे शिंदे यांच्या पक्षाचे रवींद्र फाटक यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत एकनाथ शिंदे होदेखील होते. अर्ज दाखल केल्यानंतर शिंदे यांनी माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली. याच दरम्यान, त्यांना पत्रकारांनी अंबादास दानवे यांनी केलेल्या विधानाविषयी विचारण्यात आले. दानवे यांच्या विधानावर शिंदे यांनी थेट उत्तर देण्याचे टाळले. परंतु त्यांनी आपली भूमिका मात्र स्पष्ट केली.
एकनाथ शिंदे काय म्हणाले?
आम्ही बाळासाहेबांचा, हिंदूत्त्वाचा विचार घेऊन पुढे चाललो आहेत. आम्ही महाराष्ट्रातील सर्वसामान्यांच्या मनातील सरकार आम्ही स्थापन केलेले आहे. एकदा नव्हे तर दोनदा आम्ही हे सरकार स्थापन केलेलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही महाराष्ट्रातील जनतेने शिवसेनाला, धनुष्यबाणाला, बाळासाहेब, आनंद दिघे साहेब यांच्या विचारांना, आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना आशीर्वाद दिलेले. त्यामुळे आमची ही घोडदौड अशीच पुढे चालू राहील, असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी एकत्रिकरणाचा मुद्दा अप्रत्यक्षपणे खोडून काढला.