राजकारणातील घडामोडींना वेग आला असून राजकीय पक्षात नेहमीच नेत्यांची नाराजगी, अंतर्गत मतभेद या सर्व बाबींमुळे राजकीय पक्ष आणि नेते हे नेहमीच चर्चेचा विषय बनतात. दरम्यान , आता पुन्हा अशीच एक घडामोड समोर आली आहे.
शिवसेनेने पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला सुरूवात केली आहे. आजपासून राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये बैठकांचे आयोजन करण्यात आलेले आहे. नाशिकमध्ये आज राज्यातील पहिली आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी संपूर्ण राज्यात या बैठकांचे आयोजन करण्यात आलेले आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आणि शिक्षण मंत्री दादा भुसे देखील नाशिकमधील या बैठकीला उपस्थित असणार आहेत. शिवसेनेची पाळेमुळे अधिक घट्ट करण्यासाठी ही बैठक होत आहे. मात्र आता या बैठकीवेळी शिवसेनेत अंतर्गत मतभेद असल्याचे समोर आले आहे.
शिवसेना नेते आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील विविध विधानसभा मतदारसंघाचा या बैठकीत आढावा घेतला जात आहे. पक्ष संघटन कसे मजबूत केले जाईल याबाबत बैठकीत मंथन गोत आहे. आगामी जिल्हा परिषद आणि स्थानिक विधानपरिषद निवडणुकीसंदर्भात देखील बैठकीत आढावा घेतला जात आहे. मात्र या बैठकीला नाशिकचे माजी खासदार हेमंत गोडसे यांनी दांडी मारली आहे.
दरम्यान, शिवसेनेच्या नाशिकमधील बैठकीला हेमंत गोडसे अनुपस्थित आहेत. त्यामुळे हेमंत गोडसे शिनसेनेत नाराज तर नाहीत ना असा प्रश्न उपस्थित होत आहे. ते गैरहजर असल्याने राज्यातील पहिल्याच बैठकीत शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. नव्या कार्यकारणीत संधी न दिल्याने गोडसे नाराज असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. हेमंत गोडसे नाशिकमध्ये असूनही बैठकीला न आल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहेत. कारण या बैठकीला खासदार श्रीकांत शिंदे, मंत्री उदय सामंत, मंत्री दादा भुसे आणि अनेक आमदार-खासदार, नगराध्यक्ष, उपमहापौर, नगरसेवक उपस्थित आहेत, मात्र गोडसे गैरहजर असल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.