महाराष्ट्रातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत एक आनंदाची बातमी समोर आली आहे.
जून महिन्याचा सन्मान निधी प्राप्त करण्याची प्रतीक्षा आता संपली असून, लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हा निधी जमा करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. आधारशी संलग्न असलेल्या बँक खात्यांमध्ये हा निधी उद्यापासून क्रमाक्रमाने जमा होणार आहे.
योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना या माध्यमातून आर्थिक मदत मिळणार असून, त्यांच्या आर्थिक स्थैर्याला हातभार लागणार आहे. यासंदर्भात अधिकृत पोस्ट महिला अन् बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी त्यांच्या X अकाऊंटवर केली आहे.
या संदर्भात महिला अन् बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की, महायुती सरकारचा ठाम निर्धार, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे सातत्याने मिळणारे मार्गदर्शन आणि राज्यातील लाडक्या बहिणींचा मिळणारा भरवसा या सगळ्यांमुळे ही योजना अधिक प्रभावीपणे पुढे नेली जात आहे. या योजनेमुळे राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याच्या दिशेने सरकारचा एक ठोस पाऊल असल्याचेही तटकरे यांनी नमूद केलंय.