महाराष्ट्राच्या राजकारणाचे केंद्र असलेल्या मंत्रालयासाठी आता एक नवीन इमारत उभारली जाणार आहे. मागील काही वर्षांपासून मंत्रालयाच्या पुनर्विकासाचा प्रकल्प रखडला होता, परंतु आता यावर लक्ष केंद्रित केले जात आहे. मंत्रालयाला लागूनच मंत्रालयाची पाच मजली नवी सहइमारत बांधण्यात येणार आहे. या इमारतीसाठी सुमारे ११० कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, यात २० मंत्र्यांसाठी आधुनिक आणि सुसज्ज दालनं तयार केली जाणार आहेत.

मंत्रिमंडळात दोन उपमुख्यमंत्र्यांसह ४० मंत्री
सध्या काही मंत्र्यांना विधानभवनात, तर काही कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांना मंत्रालयाच्या विस्तारित इमारतीच्या सातव्या मजल्यावर जागा देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात दोन उपमुख्यमंत्र्यांसह ४० मंत्री आहेत. यापैकी काही मंत्र्यांना मंत्रालयाच्या नव्या इमारतीत दालनं दिली जाणार आहेत. नव्या महायुती सरकारमध्ये मंत्र्यांची संख्या पूर्ण झाली असून, अनेक मंत्र्यांना मंत्रालयातून कामकाज पाहण्यासाठी दालनं उपलब्ध नसल्याची बाब समोर आली आहे.
प्रत्यक्षात अनेक मंत्र्यांची कार्यालये मंत्रालयाबाहेर असल्याने त्याचा परिणाम राज्याच्या कामकाजावर होत आहे. त्यामुळे कामकाज सुरळीत व्हावे आणि भेटीसाठी येणाऱ्यांसाठी पुरेशी आसनव्यवस्था असावी, अशा दालनांची मागणी सातत्याने होत होती. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सार्वजनिक बांधकाम विभागावर मंत्रालयासाठी नव्या सहइमारतीच्या बांधकामाची जबाबदारी सोपवली आहे.
उद्यानाच्या जागेवर बांधकाम सुरू
मंत्रालयाची ही नवी इमारत सुमारे १०० दिवसांत बांधून पूर्ण करण्याचा मानस आहे. यासाठी मंत्रालयाच्या बाजूला असलेल्या उद्यानाच्या जागेवर बांधकाम सुरू करण्यात आले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, पालिकेने तळमजला अधिक पाच मजले अशा बांधकामाला परवानगी दिली आहे. ही संपूर्ण इमारत प्री फॅब तंत्रज्ञानाचा वापर करून सिमेंट आणि स्टीलपासून पर्यावरणपूरक निकषांवर तयार केली जाईल.
इमारतीच्या प्रत्येक मजल्यावर मंत्र्यांना शासकीय बैठका घेण्यासाठी स्वतंत्र बैठक कक्ष असेल. तसेच, प्रत्येक मजल्यावर चार मंत्र्यांची दालनं आणि कर्मचाऱ्यांसाठी कार्यालय असणार आहे.
मंत्रालयाच्या या नव्या इमारतीच्या तळमजल्यावर अभ्यागतांसाठी चहापानाची सोय, कॉफी हाऊस किंवा तत्सम व्यवस्था असेल. हे नवं मंत्रालय प्रत्यक्षात कसे दिसेल आणि यावर विरोधकांची प्रतिक्रिया काय असेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.