नरेंद्र मोदींचा पुढचा वारसदार महाराष्ट्रातून असेल आणि तो संघ ठरवेल, असं मोठं विधान शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं. त्यावरून आता राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र राऊतांच्या या विधानावर थेट आणि स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे. वडील जिवंत असताना मुलांचा विचार करायचा नाही, तो होत नसतो. त्यामुळे मोदींचा उत्तराधिकारी निवडण्याची वेळ अजून आली नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले. माझा विषय आहे, मााझा त्याच्याशी संबंध नाही, असंही त्यांनी नमूद केलं.
‘मोदींचा उत्तराधिकारी शोधण्याचं कोणतंही कारण नाही,नरेंद्र मोदी हे आमचे नेते आहेत, अजून बरीच वर्ष ते काम करणार आहेत.
आमच्या सगळ्यांचा आग्रह आहे , 2029 चे पंतप्रधान म्हणून आम्ही नरेंद्र मोदी यांच्याकडेच पाहतो आहोत. पूर्ण देशही तेच बघत आहे, त्यामुळे आत्ता अशी चर्चा करणं योग्य होणार नाही.
भारतीय संस्कृतीमध्ये वडील जिवंत असताना मुलांचा विचार होत नाही, करायचाही नसतो. ही सगळी मुघल संस्कृती आहे, त्यामुळे आत्ता कोणाचाही, कुठेही उत्तराधिकारी निवडण्याची वेळही आलेली नाही, तसा प्रश्नही नाही. जोपर्यंत माझा विषय आहे, मााझा त्याच्याशी संबंध नाही’, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलं.