स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या तोंडावर महायुतीत भूकंप झाल्याचं चित्र आहे. महायुतीतील घटक पक्ष काही ठिकाणी वेगवेगळे लढताना दिसत आहेत. काही ठिकाणी शिंदे गटातील बाहुबली नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. यामुळे शिंदे गटाचे प्रमुख नेते नाराज झाल्याची माहिती मिळत आहे. निवडणुकीच्या तोंडावरील या नाराजीनाट्याचे पडसाद मंत्रिमंडळाच्या बैठकीत उमटल्याचेही पाहायला मिळाले.
फोडाफोडीच्या राजकारणावरून महायुतीतच नाराजीनाट्य सुरु झालंय. पक्षप्रवेशामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाणांविरोधात शिवसेनेत प्रचंड नाराजी असल्याचे बोलले जात आहे. आम्हाला जर अधिकार , निधी वाटप , अधिकारी बदली याबाबत अधिकार नसतील बैठकीला येऊन उपयोग काय असा सवाल शिंदेंच्या मंत्र्यांनी उपस्थित केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
शिंदेच्या मंत्र्यांनी आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकला. त्यानंतर मुख्यमंत्री आणि शिंदेंच्या मंत्र्यांमध्ये चर्चा होऊन तोडगा निघण्याची शक्यता आहे. त्यातच शिंदेंचे मंत्री भरत गोगावलेंनी आता एक वक्तव्य केलं. थोड्याच वेळात आम्ही एक स्फोट करणार आहोत, तो पाहा असा इशारा भरत गोगावलेंनी दिला. त्यानंतर हा स्फोट आमची नैसर्गिक युती असलेल्या पक्षाशी संबंधित नसल्याचंही गोगावलेंनी स्पष्ट केलं.
भाजपच्या ऑपरेशन लोटसमुळे शिंदेंची शिवसेना नाराज असल्याचं दिसून आलं. त्यामुळेच एकनाथ शिंदे वगळता सर्वच मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकला. आम्ही आमच्या वैयक्तिक कारणास्तव बैठकीला गेलो नव्हतो, त्यामध्ये इतर कोणतीही गोष्ट नाही असं स्पष्टीकरण भरत गोगावलेंनी केलं.