मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मिरा रोडमध्ये मध्ये मनसैनिकांना संबोधित केलं. यावेळी राज ठाकरे यांनी भाषणाची सुरुवात मराठी बांधवांनो, भगिनींनो मातांनो अशी केली. याच भाषणात त्रिभाषा सूत्राचं समर्थन करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना राज ठाकरेंनी आव्हान दिलं.
काय म्हणाले राज ठाकरे?
राज ठाकरे म्हणाले,काय विषय होता, पहिली ते पाचवी राज्य सरकारनं हिंदी कम्पलसरी केली होती. पहिलीपासून हिंदी शिकली पाहिजे त्याच्यावरुन हे सुरु झालं. काल आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांनी सांगितलं म्हणे तिसरी हिंदी भाषा आम्ही सक्तीची करणार म्हणजे करणार, राज्य सरकारला आत्महत्या करायची असेल तर त्यांनी बेशक करावी. त्या दिवशीच्या मोर्चाच्या धसक्यानं निर्णय मागे घ्यायला लागला होता, अशी आठवण राज ठाकरे यांनी करुन दिली.
फडणवीस जी तुम्ही सांगतायना तिसरी भाषा सक्तीची आणणार म्हणजे आणणार मी आता सांगतो महाराष्ट्रात पहिली ते पाचवी ते हिंदी आणायचा प्रयत्न करुन बघा, दुकानं नाही शाळाही बंद करेन, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला.
महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी भांडतोय, इतर बाकीच्या शाळांमध्ये मराठी सक्तीची केली पाहिजे. ते सोडून हिंदी सक्तीची करण्यासाठी लागलेला आहात. कुणाच्या दबावासाठी, कोण दबाव टाकतंय, केंद्राचं हे पूर्वीचं आहे. काँग्रेस असल्यापासून सुरु आहे, असं राज ठाकरे म्हणाले.