शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा , शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी या मागणीसाठी बच्चू कडू आक्रमक झाले आहेत. रास्तारोकोनंतर त्यांनी आता रेल्वे रोकोचाही इशारा दिला आहे. दरम्यान आज बच्चू कडू यांनी राज्य सरकारशी चर्चा करण्यासाठी मुंबईत येण्याला होकार दर्शविला आहे.
आज संध्याकाळी ७ वाजता सह्याद्री अतिथिगृहावर शेतकरी आंदोलकांच्या मागण्यांबाबत महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित असतील. तर आंदोलकांकडून बच्चू कडू, राजू शेट्टी, महादेव जानकर आणि अजित नवले हे बैठकीत सरकारसोबत वाटाघाटी करण्यासाठी उपस्थित राहतील.
ही उच्चस्तरीय बैठक असल्याने या बैठकीला मुख्य सचिवांसोबतच विविध विभागातील 30 वरीष्ठ अधिकारी देखील उपस्थित असतील. त्यामुळे आजच्या या बैठकीत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. या बैठकीत बच्चू कडू यांनी दिलेले निवेदन आणि 7 एप्रिल रोजी बच्चू कडुंसोबतच्या बैठकीत केलेल्या निर्णयावरील कार्यवाहीचा आढावा घेतला जाईल.
आजच्या बैठकीनंतर तोडगा निघाला नाही तर मुंबईवरून नागपूरला परत आल्यावर आम्ही आंदोलनाची दिशा ठरवू. आजच्या बैठकीत कर्जमाफी , पंजाबच्या धर्तीवर शेतमाल खरेदी केंदे, 20 टक्के बोनस , हमीभाव याबाबत चर्चा होईल, असे बच्चू कडू यांनी सांगितले.