शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांना घेऊन प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू हे चांगलेच आक्रमक झाले आहे. त्यांच्या नेतृत्वात राज्यभरातील शेतकरी आणि प्रहार कार्यकर्त्यांनी नागपुरात चक्काजाम आंदोलन केले. या आंदोलनकर्त्यांनी नागपूर वर्धा आणि जबलपूर हैदराबाद महामार्गासह इतर चार महामार्ग रोखून धरले होते. आंदोलनादरम्यान परवानगीवरून कडू यांची पोलीस अधिकाऱ्यांशीही बाचाबाची झाली होती.
जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा आक्रमक पवित्रा बच्चू कडू यांनी घेतला आहे. बच्चू कडू मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. मुंबईत मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे. कर्जमाफीच्या मागणीसाठी बच्चू कडूंचं आंदोलन आता निर्णायक टप्प्यात पोहोचलं आहे.
'कर्जमाफीसाठी मरायलाही तयार आहोत.', असा कडक इशारा बच्चू कडूंनी सरकारला दिला आहे. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी सुरू असलेल्या या आंदोलनामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सुरू असलेल्या तीव्र आंदोलनादरम्यान बच्चू कडू भावनिक झाले. वरचा देव पावला, खालचा देव पावतो का नाही बघू. असेही यावेळी ते म्हणाले.
शेतकऱ्यांचा जीव वाचवण्यासाठी आम्ही झटत आहोत असं म्हणताना कडूंच्या डोळ्यांत अश्रू आले. त्यांच्या या भावनिक क्षणाने आंदोलनात उपस्थित शेतकरीही भावुक झाले. राज्यभरातून या आंदोलनाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. बच्चू कडू यांच्या आंदोलनाला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पाठिंबा दिला. त्यांनी नागपुरात येऊन बच्चू कडू यांची भेट घेतली आणि सरकारने मागणी मान्य करावी असं आवाहन केले.